केरळ : ‘जन गण मन’, ‘लूसिफर’, ‘कोल्ड केस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला प्रसिद्ध मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी आहे. ‘विलायत बुद्ध’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पृथ्वीराजच्या पायाला दुखापत झाली असून त्यानंतर त्याच्यावर तातडीने सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्याला पुढील काही महिने पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पृथ्वीराज हा इडुक्कीमधील मरयूर याठिकाणी एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याला दुखापत झाली. बसच्या आतमध्ये शूटिंग करताना त्याच्या पायाला जबर मार लागला. त्यानंतर त्याला तातडीने एर्नाकुलम इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पृथ्वीराजच्या गुडघ्यावर की-होल सर्जरी करण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दोन महिने विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील काही महिने तो शूटिंग करू शकणार नाही. “डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर पृथ्वीराजला काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. फक्त एकाच दिवसाचं शूटिंग राहिलं असताना ही घटना घडली आहे. पण पृथ्वीराज आता शूटिंग करू न शकल्याने आम्ही चित्रपटाचं काम काही दिवस थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती दिग्दर्शक जयन नांबियार यांनी दिली.
‘विलायत बुद्ध’ या चित्रपटाची कथा चंदनाच्या झाडाच्या मालकीवरून दोन मुख्य पात्रांमधील संघर्षाभोवती फिरते. पृथ्वीराज व्यतिरिक्त या चित्रपटात अनु मोहन आणि प्रियंवदा कृष्णन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाशिवाय तो प्रभासच्या आगामी ‘सलार’ या चित्रपटातही झळकणार आहे. ‘केजीएफ’ फेम दिग्दर्शिक प्रशांत नील या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट येत्या 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पृथ्वीराज त्याच्या घरावरील आयकर छाप्यांमुळे चर्चेत आला होता. अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारनच्या घरापासून छापेमारीची सुरुवात झाली होती. इतर नामांकित निर्माते अँटनी पेरुंबवुर, अँटो जोसेफ आणि लिस्टिन स्टीफन यांच्याही घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले होते.