मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मल्याळम कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री डॉ. प्रियाचं निधन झालं आहे. कार्डिॲक अरेस्टने प्रियाचं निधन झालं असून ती आठ महिन्यांची गरोदर होती. प्रियाच्या निधनानंतर तिच्या बाळावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अभिनेता किशोर सत्याने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. डॉ. प्रियाने ‘कारुठमुतू’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. 31 ऑक्टोबर रोजी कार्डिॲक अरेस्टने तिचं निधन झालं.
किशोर सत्या यांनी सोशल मीडियावर लिहिलं, ‘मल्याळम टेलिव्हिजन सेक्टरमधील आणखी एक अनपेक्षित निधन. डॉ. प्रिया यांचं काल कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिला आरोग्याची दुसरी कोणतीच समस्या नव्हती. डॉ. प्रिया ही एकुलती एक मुलगी होती. मुलीच्या अचानक निधनाने तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे. डॉ. प्रियाचा पती नान्नाच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत आहेत.’
‘त्यांचं सांत्वन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना असे दिवस का पाहावे लागतात? माझ्या डोक्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्यांची उत्तरं कदाचित मला मिळणार नाहीत. नुकतंच अभिनेत्री रेंजुषाचं निधन झालं. त्यानंतर आता आणखी एक धक्का मल्याळम कलाविश्वाला बसला आहे. जेव्हा एक 35 वर्षांची व्यक्ती या जगाचा निरोप घेते, तेव्हा त्यावर श्रद्धांजली वाहण्यासाठी मन तयार नसतं. या धक्क्यातून प्रियाची आई आणि तिचा पती कसे सावरतील माहीत नाही. त्यासाठी त्यांना शक्ती मिळो’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सोमवारी मल्याळम मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेंजुषा मेननच्या निधनाची माहिती समोर आली होती. 35 वर्षीय रेंजुषा तिरुवअनंतपुरममधील श्रीकार्यम इथल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. गेल्या काही काळापासून ती आर्थिक समस्यांचा सामना करत होती. सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास श्रीकार्यम पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रेंजुषाच्या निधनामागचं प्राथमिक कारण आत्महत्या असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तिच्या निधनामागील कारणाचा तपास पोलीस करत आहेत.