अभिनेत्री मंदिरा बेदीने 2021 मध्ये पती राज कौशलला गमावलं. पतीच्या निधनानंतर मंदिरा आजवर त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली नव्हती. राज कौशलबद्दल बोलणं तिने टाळलं होतं. मात्र आता पहिल्यांदाच ती पतीबद्दल व्यक्त झाली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने सांगितलं की ती कशा पद्धतीने या दु:खातून सावरली आणि आता तिचं आयुष्य कसं जगतेय? जून 2021 मध्ये राज कौशलचं निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालं होतं. पतीच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर मंदिराने या मुलाखतीत भावना व्यक्त केल्या आहेत. पतीचा उल्लेख करताच डोळ्यात अश्रू यायचे, यामुळे माझ्यात बोलण्याची हिंमत नव्हती.. असं तिने सांगितलं.
या मुलाखतीत मंदिराने सांगितलं की राजच्या निधनानंतर पहिलं वर्ष तिच्यासाठी सर्वांत कठीण होतं. मात्र आता हळूहळू सर्व गोष्टी ठीक होत आहेत. याविषयी ती म्हणाली, “मी आणि माझी मुलं दररोज त्याच्याविषयी विचार करतो. असं नाहीये की मी त्याला विसरले आहे. पहिलं वर्ष खूप, खूप, खूप कठीण होतं. पहिल्या गोष्टीचा सामना करणं खूप कठीण असतं. पहिला जन्मदिन, पहिली ॲनिव्हर्सरी, पहिली दिवाळी, पहिला ख्रिसमस. दुसरं थोडं सोपं गेलं, तिसरं थोडं आणखी सोपं..”
या दु:खातून बाहेर येण्यासाठी स्वत:ला कामात झोकून दिल्याचं तिने सांगितलं. “असेही काही क्षण आले की जेव्हा आम्हाला एखादं गाणं ऐकल्यावर त्याची आठवण आली. मला ज्या थेरपीची गरज होती, ती मी घेतली. एक माणूस म्हणून तुम्ही नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करता. आता मी त्याच्याबद्दल बोलू शकते. आजही मी त्याच्याबद्दल बोलताना भावूक होते. मात्र मी आता बोलू शकते. एक वेळ अशी होती जेव्हा मी इतकंसुद्धा बोलू शकत नव्हते. मात्र मी खचणार नाही. पतीच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतर मी कामाला सुरूवात केली. कारण मला माझ्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायची होती. माझ्या मुलांखातर मला हे करावं लागलं,” असं ती पुढे म्हणाली.