चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोन्नियिन सेल्वन’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त त्यांनी नुकतीच एका चर्चासत्राला हजेरी लावली. या चर्चासत्रात ते दाक्षिणात्य चित्रपटांचा जागतिक चित्रपटांवरील प्रभावाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. चेन्नईमधील CII दक्षिण मीडिया आणि एंटरटेन्मेंट समिटमध्ये या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मणिरत्नम यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. “जर हिंदी चित्रपटसृष्टी स्वत:ची ओळख बॉलिवूड म्हणून देणं थांबवू शकत असेल तर लोक भारतीय सिनेमाला बॉलिवूड म्हणून ओळखणं थांबवतील”, असं ते म्हणाले.
पाश्चिमात्य देशात भारतीय सिनेमाला सरसकट बॉलिवूड म्हणून संबोधलं जातं. त्याचा संदर्भ देत मणिरत्नम या चर्चासत्रात म्हणाले, “जर हिंदी सिनेमा स्वत:ला बॉलिवूड म्हणणं थांबवू शकत असेल तर इतर लोकही भारतीय सिनेमाला बॉलिवूड म्हणून ओळखणं थांबवतील. मी बॉलिवूड, कॉलिवूड यांसारख्या ‘वूड्स’चा चाहता नाही. आपल्याला एकंदरीत भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहण्याची गरज आहे.” या चर्चासत्रात मणिरत्नम यांच्याशिवाय चित्रपट निर्माते वेत्रीमारन आणि बेसिल जोसेफ यांनीसुद्धा सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे ‘कांतारा’ फेम अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीसुद्धा तिथे उपस्थित होता.
2010 मध्ये ‘रावण’ या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि दिग्दर्शक मणिरत्नम पुन्हा एकदा एकत्र आले. ‘पोन्नियिन सेल्वन 1’च्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, कार्ती, चियान विक्रम, त्रिशा आणि जयम रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय प्रकाश राज, प्रभू, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, जयराम, अश्विन काकुमानू, मोहन रमण, सरथकुमार आणि पार्थवन या सहाय्यक कलाकारांचाही त्यात समावेश आहे.
पोन्नियिन सेल्वन 2 हा चित्रपटसुद्धा कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1955 च्या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या भागात प्रेक्षकांनी पोन्नियिन सेल्वनला त्याच्या मृत्यूला सामोरं जाताना पाहिलंय. त्याचवेळी ऐश्वर्या रायची ओमाई राणी त्याला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारते. पहिल्या चित्रपटाची कथा जिथे संपली, तिथूनच दुसऱ्या भागाची सुरुवात होणार आहे.