मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सूत्रसंचालक मनीष पॉल लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या आगामी ‘रफूचक्कर’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्यामध्ये मनीष पॉल पाच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसला. या पाच विविध भूमिका साकारण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागली. आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळतंय.
रफूचक्कर या सीरिजमध्ये मनीषने एका बाजूला स्थूल व्यक्तीची भूमिका साकारली आहे तर दुसऱ्या भूमिकेत तो एकदम फिट दिसतोय. या भूमिकांसाठी त्याला वजन वाढवून कमी करावं लागलं होतं. सुरुवातीला त्याने दहा किलो वजन वाढवलं. त्यानंतर लगेच अडीच महिन्यात त्याला 15 किलो वजन कमी करावं लागलं. फॅट आणि फिट असे दोन्ही रुप या सीरिजमध्ये पहायला मिळत आहेत. मात्र हा प्रवास काही सोपा नव्हता.
एका मुलाखतीत मनीष म्हणाला की तो आधीपासूनच फिटनेस फ्रीक आहे. पण त्यासाठी तो फारसा जिमला जात नाही. फक्त खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि आवश्यक व्यायाम करून स्वत:ला फिट ठेवायचा. मात्र रफूचक्कर या सीरिजमध्ये त्याच्या शरीरात बरेच बदल झाले. रफूचक्कर सीरिजमधील पवन कुमार बावरियाच्या भूमिकेसाठी त्याने दहा किलो वजन वाढवलं होतं. त्यानंतर जिम ट्रेनरच्या भूमिकेसाठी त्याने वजन कमी केलं.
मनीष पॉल त्याच्या दमदार सूत्रसंचालनासाठी आणि विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो. सलमान खानसोबत करण जोहरपर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी त्याच्यासोबत शो होस्ट केला आहे. आज (15 जून) त्याची वेब सीरिज जियो सिनेमावर स्ट्रीम होत आहे. यामध्ये त्याने पाच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
मनिष सध्या 41 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 3 ऑगस्ट 1981 रोजी दिल्लीत झाला. त्याने करिअरची सुरुवात सूत्रसंचालक म्हणूनच केली. शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाही तो विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायचा. मनिष पॉलला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याच्या मुलीचं नाव सायशा असं आहे तर मुलाचं नाव युवान आहे.