अभिनेत्री मनीषा कोइरालाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून (1 मे) पहायला मिळेल. मनीषाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांसोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. ‘हिरामंडी’च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मनीषा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटाविषयी बोलतानाच मनीषाने आयुष्याच्या या टप्प्यावर असताना दुसरं प्रेमाच्या प्रतीक्षेत आहेत का, याविषयी सांगितलं.
‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनीषा म्हणाली, “काही लोक आयुष्यात खूप नशिबवान असतात, ज्यांना फारसे चढउतार पहायला मिळत नाहीत. अत्यंत सुखाने आणि शांतीने ते त्यांचं आयुष्य जगतात. मीसुद्धा नशिबवान आहे की मला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. मी फक्त अशी आशा करते की यामुळे माझ्या मनात आयुष्याबद्दल कटुता निर्माण होणार नाही.” या मुलाखतीत मनीषाने हेसुद्धा सांगितलं की ती घटस्फोटादरम्यान कशी स्ट्राँग राहिली आणि त्यानंतर कॅन्सरशी यशस्वी झुंज कशी दिली? “परिस्थितीला मी कशी बदलू शकते हे माझं काम आहे. आयुष्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहायचं, ते माझ्यावर आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा.. यातलं काय पहायचं? मी माझ्या आयुष्याला त्रासदायक समजते का? तर नाही. उलट अशा परिस्थितीतून मी आयुष्याबद्दल नवीन गोष्टी शिकत पुढे जाते”, असं ती पुढे म्हणाली.
एंग्झायटी अटॅक्स येत असल्याचाही खुलासा मनीषाने या मुलाखतीत केला. “मला एंग्झायटी अटॅक यायचे आणि मला लगेच असुरक्षित वाटायचं. लोकांकडे ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व माझ्याकडे होत्या. तरीही मी नैराश्यात होती आणि मला स्वत:विषयी फार वाईट वाटायचं. अशा वेळी मी स्वत:ला म्हणायची की नाही मनीषा उठ आणि चालायला लाग. मला वाटतं की जेव्हा तुम्ही आयुष्यात अशा अनेक गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवतं की आयुष्याची ही दुसरी बाजू आहे. अशा वेळी तुम्ही स्वत:ला उभं करा आणि चालायला लागा”, असं मनीषा म्हणाली.
या वयात दुसऱ्या पार्टनरच्या शोधात आहेस का, असा प्रश्न मनीषाला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं, “जर मी नाही असं म्हटलं तर ते खोटं ठरेल. माझ्या आयुष्यात एखादा जोडीदार किंवा पार्टनर असावा असं मला वाटतं. जर तो पार्टनर आयुष्यात असेल तर चांगलीच गोष्ट असते. पण त्यासाठी मी प्रतीक्षा करत माझा वेळ वाया घालवणार नाही. माझ्या नशिबात असेल तर तो मला भेटेल. जर नसेल तरी ठीक आहे. सध्या मी माझं आयुष्य मनमुराद जगतेय.” मनीषाने 2010 मध्ये नेपाळी बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.