अभिनेत्री मन्नारा चोप्रा ‘बिग बॉस’ या शोमधून घराघरात पोहोचली. या शोमधील तिचा प्रवास अनेक चढउतारांचा होता. ग्रँड फिनालेपर्यंत ती पोहोचली होती. मन्नारा ही अभिनेत्री प्रियांका आणि परिणीची चोप्रा यांची चुलत बहीण आहे. असं असतानाही तिने बिग बॉसच्या घरात कधीच आपल्या फायद्यासाठी बहिणींचा उल्लेख केला नव्हता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मन्नारा तिच्या बहिणींविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
बिग बॉसच्या घरात बहिणींविषयी न बोलण्याच्या निर्णयाबद्दल मन्नारा म्हणाली, “जर मी माझ्या कुटुंबाचं नाव घेतलं, तर ते मला ‘नेपो किड’ (घराणेशाहीतून आलेली मुलगी/ स्टारकिड) म्हणतील. माझं स्वत:चं काहीच अस्तित्व नाही, असं ते म्हणाले असते. आता जर मी त्यांचं नाव घेतलं नाही तर त्यांनी माझ्यावर टीका करण्यासाठी एक नवीन कथा शोधून काढली आहे. माझं माझ्या बहिणींसोबत चांगलं नातं नाही, असं ते म्हणतायत. त्यांना मी हे सांगू इच्छिते की नात्यांच्या बाबतीत मी खूप स्पष्ट आहे. मला लहानपणापासूनच खूप प्रेम मिळालंय आणि हेच प्रेम मी इतरांसाठीही व्यक्त करते. माझ्या आईकडूनच मी हे शिकले.”
“मी कोण आहे हे लोकांनी पहावं आणि माझ्या संघर्षाला मीच सामोरी जावी, यासाठी मी बिग बॉसच्या घरात कोणाचीच नावं घेतली नव्हती. जेव्हा मी मीटिंग्स किंवा लूक टेस्ट द्यायला जाते, तेव्हासुद्धा मी त्या चौकटीत एकटीच उभी असते. आता बिग बॉसनंतर इंडस्ट्रीतील लोक जर माझ्याशी बोलत असतील किंवा चर्चा करत असतील तर ते माझ्या स्वभावामुळे आहे. मी एका विशिष्ट कुटुंबाची आहे हे त्यांना माहित आहे, पण मी त्यांच्याशी कशी वागते यावरही सर्व अवलंबून आहे. दिवसाअखेर तुम्ही कसे आहात, लोकांशी कसे वागता.. यालाच जास्त महत्त्व असतं. मी माझ्या बहिणींची नावं घेणं मुद्दाम टाळलं होतं, कारण तो खेळच पूर्णपणे माझ्या व्यक्तिमत्त्वावर आधारित होता. तिथे मला माझं व्यक्तिमत्व दाखवणं महत्त्वाचं होतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
प्रियांका चोप्राने जेव्हा ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता तेव्हा मन्नारा किशोरवयीन होती. बहिणीच्या प्रवासाचा सकारात्मक परिणाम मन्नारावर झाला होता. “तिचा आम्हा सर्व चुलत बहिणींवर खूप मोठा प्रभाव होता. स्वतंत्र आणि खंबीर स्त्री अशी तिची ओळख आहे. मी लहानाची मोठी होत असताना तिलाच पाहत आले. स्वत:च्या हिंमतीवर आणि मेहनतीच्या जोरावर तिने कशाप्रकारे गोष्टी कमावल्या आहेत, हे पाहणं माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होतं”, असं ती पुढे म्हणाली.