मुंबई : आपल्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या डाएटविषयी महत्त्वाचा खुलासा केला. गेल्या 14 वर्षांपासून त्यांनी रात्रीचं जेवण केलंच नाही. रात्री काहीच खात नसल्याचं त्यांनी सांगितलं. मनोज बाजपेयी हे त्यांच्या आरोग्यासाठी असं करतात. सर्वसाधारणपणे लोक फिट राहण्यासाठी व्यायाम आणि योग करतात, जिमला जातात आणि तिन्ही वेळा योग्य डाएट फॉलो करतात. मात्र मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या रुटीनमधून डिनरला पूर्णपणे काढून टाकलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी डिनर करणं का सोडून दिलं, याविषयीचा खुलासा केला.
“या गोष्टीला 13-14 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी विचार केला की माझे आजोबा माझ्यापेक्षाही बारिक होते पण ते नेहमीच फिट असायचे. मी सुद्धा त्यांचं रुटीन फॉलो करून पाहतो, असं ठरवलं होतं. त्यांच्यासारखा दिनक्रम पाळू लागलो तेव्हा माझं वजन नियंत्रणात आलं होतं. मी दिवसभर उत्साही असायचो आणि मला फार निरोगी वाटायचं. तेव्हा मी ठरवलं की आता आयुष्यभर मी हाच नियम पाळणार”, असं त्याने सांगितलं.
मनोज बाजपेयीने पुढे म्हटलं, “मी कधी 12 तास तर कधी 14 तास उपवास करून पाहिलं. हळूहळू मी रात्रीचं जेवण बंद केलं. दुपारच्या जेवणानंतर किचनमध्ये काहीच बनायचं नाही. जेव्हा आमची मुलगी हॉस्टेलमधून घरी येते, तेव्हाच दुपारनंतर जेवण बनवलं जातं.”
सुरुवातीला हे रुटीन फॉलो करणं खूप कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच भूक मिटवण्यासाठी ते पाणी प्यायचे आणि बिस्किट खायचे. मनोज बाजपेयीच्या मते या रुटीनमुळे त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच मोठा बदल झाला. याच कारणामुळे मला कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीज नाही, असं तो सांगतो.