मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. हेरा फेरी, चुप चुप के, हंगामा, खट्टा मीठा, देवदास यांसारख्या 100 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच ते आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात झळकले होते. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी मोठा खुलासा केला. स्ट्रोकमुळे जवळपास दीड वर्ष झोपून राहावं लागलं होतं, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीवरही त्याचा परिणाम झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज जोशींनी प्रकृतीविषयी सांगितलं.
‘राजश्री अनप्लग्ड’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनोज जोशी हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना स्ट्रोक आला होता. “2001 मध्ये मी आजारी पडलो होतो. मला स्ट्रोक आला होता आणि जवळपास दीड वर्षापर्यंत मी रुग्णालयात बेडवर होतो. देवदास या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी आजारी पडलो होतो. त्यावेळी मी चार दिवस कोमामध्ये होतो. माझी नेत्रदृष्टी गेली होती. 19 दिवसांपर्यंत मला काहीच दिसत नव्हतं. हा माझा जणू पुनर्जन्म आहे. रुग्णालयात असताना माझा बँक बॅलेन्स शून्य झाला होता आणि माझ्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी पत्नीला ट्युशन घ्यावे लागले होते”, असं त्यांनी सांगितलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “2003 मध्ये मला ‘कहता है दिल’मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये मी खलनायकाची भूमिका साकारली होती. मला सुरुवातीला फक्त चार दिवसांचं काम मिळालं होतं. मात्र नंतर माझी भूमिका वाढवली गेली आणि अखेर मी या मालिकेच्या मुख्य कलाकारांपैकी एक झालो. त्यानंतर मला हंगामा, हलचल यांसारखे चित्रपट मिळाले. निर्माते प्रियदर्शन यांच्यासोबत मी 12 चित्रपटांमध्ये काम केलंय.”
‘ड्रीम गर्ल 2’च्या आधीही मनोज जोशी यांनी बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटातील त्यांची कचरा सेठची भूमिका चांगलीच गाजली होती. त्या भूमिकेवरून आजही सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होतात. मनोज जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1965 रोजी गुजरातच्या हिम्मत नगरमध्ये झाला. त्यांनी मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय त्यांनी हिंदी आणि गुजराती भरपूर रंगभूमीवरही काम केले.