’12th फेल’च्या कथेसाठी IPS अधिकारी मनोज शर्मा यांना किती पैसे मिळाले?

| Updated on: Feb 24, 2024 | 5:35 PM

'बारवी फेल' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. आयपीएस ऑफिसर मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात विक्रांत मेस्सीने त्यांची मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटासाठी मनोज शर्मा यांना किती मानधन मिळालं, याचा खुलासा त्यांनी केला.

12th फेलच्या कथेसाठी IPS अधिकारी मनोज शर्मा यांना किती पैसे मिळाले?
Manoj Kumar Sharma
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 24 फेब्रुवारी 2024 | विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ’12th फेल’ या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सीने मुख्य भूमिका साकारली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज शर्मा यांनी चित्रपटासाठी काही रक्कम मिळाली का, याविषयी खुलासा केला. आपल्या आयुष्याची कहाणी दिग्दर्शकांना सांगितल्याबद्दल आणि आपल्याच आयुष्याबद्दल पुस्तक लिहिण्यासाठीही कोणतंच मानधन स्वीकारलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

या मुलाखतीत मनोज कुमार शर्मा म्हणाले, “जर तुम्ही मला असं विचारत असाल की वैयक्तिकदृष्ट्या मला काय मिळालं, तर त्याचं उत्तर काहीच नाही असं असेल. कारण मी कोणाकडूनच पैसे घेत नाही किंवा लोकांकडून मी तशी अपेक्षाही करत नाही. मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. आयपीएस अधिकारी म्हणून माझी निवड होत असताना मी जितका प्रामाणिक होतो, तितकाच आजही आहे. माझी पत्नीसुद्धा तशीच आहे.”

हे सुद्धा वाचा

घरी आणि कामाच्या ठिकाणीही ‘नो गिफ्ट सिस्टिम’चं (भेटवस्तू न स्वीकारणं) पालन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “जेव्हा मी आणि माझी पत्नी परीक्षेची तयारी करत होतो तेव्हाच आम्ही निर्णय घेतला होता की कधीच डायमंड्स किंवा दागिने घालायचे नाहीत. माझी पत्नी आजही ते वापरत नाही, म्हणून आम्हाला त्याचाही खर्च नाही. आम्ही कोणत्याही गिफ्ट सिस्टिमचं पालन करत नाही. लग्नाच्या वाढदिवशी किंवा वाढदिवशी आम्ही एकमेकांना भेटवस्तू देत नाही. जर आम्हाला खरंच एकमेकांना भेट द्यायची असेल तर आम्ही एकमेकांना पत्र लिहितो. त्यामुळे आम्हाला शॉपिंगला जायचीही गरज नाही.”

‘बारवी फेल’ या चित्रपटामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आणि हीच प्रेरणा म्हणजे खरं बक्षिस अशी भावना मनोज यांनी व्यक्त केली. “या देशातील लोकांना मला जी गोष्ट सांगायची होती, ती मी या पुस्तकाद्वारे आणि चित्रपटाद्वारे उत्तमरित्या सांगू शकलो, हा सर्वांत मोठा फायदा आहे. त्यातून तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्ही शिकू शकता. शालेय विद्यार्थी मला पत्र पाठवत आहेत आणि त्यांना माझ्यासारखं व्हायचंय असं ते म्हणतायत, यातच मी खूप खुश आहे. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, हेच खरं बक्षीस आहे”, असं ते पुढे म्हणाले.