पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी हे पुण्यातील तळेगाव दाभाडे इथल्या सदनिकेत मृतावस्थेत आढळले. तळेगाव दाभाडेमधील आंबी इथल्या क्सर्बिया सोसायटीमध्ये ते भाडेतत्त्वावर राहत होते. गेल्या आठ महिन्यांपासून ते या सदनिकेत एकटेच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने अद्याप त्यांनी रवींद्र महाजनी यांच्या निधनाबद्दलची माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी आतापर्यंत नेमकं काय काय घडलं, ते जाणून घेऊयात..
रवींद्र महाजनी यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शेजारच्यांनी पोलिसांना याविषयी कळवलं. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एक टीम घटनास्थळी पोहोचली. महाजनी यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी स्थानिकांसमोर त्यांचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करताच त्यांना महाजनी मृतावस्थेत आढळले. घरमालकाने मृतदेहाची ओळख रवींद्र महाजनी असं पटवून सांगितलं.
महाजनी यांच्या मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानंतर पोलिसांनी याबद्दलची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. गश्मीर तळेगाव दाभाडेला पोहोचल्यानंतर महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यावर अद्यार गश्मीरची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. गश्मीरची आई आजारी असल्याने त्यांना याबद्दल अद्याप सांगण्यात आलं नाही. त्यामुळे महाजनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे पार पडतील, हे अद्याप निश्चित नाही.
शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र या सर्व प्रकरणात रवींद्र महाजनी गेल्या काही महिन्यांपासून एकटे का राहत होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुलगा इतका मोठा स्टार असूनही महाजनी हे तळेगाव दाभाडेला एकटे भाडेतत्त्वावर का राहत होते, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गश्मीर हा मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने हिंदी मालिका आणि रिॲलिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात रवींद्र आणि गश्मीर महाजनी एकत्रच झळकले होते.
रवींद्र महाजनी यांचा जन्म कर्नाटकातील बेळगावी झाला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी हे त्यांचे वडील होते. रवींद्र महाजनी यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनेमा क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी रवींद्र महाजनी यांनी प्रचंड प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी महाजनी यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी छोटीमोठी कामे करण्यास सुरुवात करतानाच टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली.