पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी पत्नीकडून ‘करवा चौथ’चा उपवास केला जातो. दिवसभर उपवास करून रात्री चाळणीतून पतीचा चेहरा आणि चंद्राला पाहून हा उपवास सोडला जातो. उत्तर भारतीयांमध्ये करवा चौथ अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. पण नुकत्याच एका मराठी अभिनेत्याने त्याच्या पत्नीसोबतचा करवा चौथचा फोटो पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी त्याला तुफान ट्रोल केलं. ‘मराठी संस्कृती विसरत चालला आहात’, असे कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. या ट्रोलिंगला वैतागून अखेर त्या अभिनेत्याने सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता कपिल होनराव याने टीका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
करवा चौथनिमित्त कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नीसोबतचे काही फोटो पोस्ट केले. यामध्ये कपिलची पत्नी हातात चाळणी आणि दिवा घेऊन करवा चौथचा उपवास सोडताना दिसून येत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कपिलने सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. हा फोटो पाहताच अनेकांनी त्यावरून प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. ‘आपण आपली संस्कृती जपली पाहिजे,’ असं एका युजरने लिहिलं. तर ‘उत्तरप्रदेश-बिहारचे लोक हा सण साजरा करतात. मराठी असून त्यांचे सण साजरे करताना लाज वाटायला हवी. मराठी म्हणून यांना डोक्यावर घेतो अणि हे यांचे सण साजरे करतात,’ अशा शब्दांत दुसऱ्याने टीका केली. अखेर या ट्रोलिंगला वैतागून कपिलने त्याच्या पोस्टवर कमेंट करत सडेतोड उत्तर दिलं.
‘आज काल लोकांना काय झालंय काय माहीत. मराठी कलाकार असे झालेत तसे झालेत….उगाच इथे मराठीमध्ये हे नाही ते नाही… ही कमेंट करण्याआधी सत्य परिस्थिती जाणून घ्या. वीट आलाय यार या लोकांचा. माझी बायको नॉर्थ साइडची आहे. हिंदी भाषिक आहे. हा तिचा सण आहे. जसं ती मराठी सण साजरे करते माझ्यासोबत तसं हा सण पण मी तिच्यासाठी करतो. तिला मारून, तिचा अपमान करून हे मराठी मध्ये नाही करत तर नाही करायचा. माझी मराठी परंपरा, मराठी संस्कृती आहे हे नाही करायचं,हे नाही ना बोलू शकत. थोडं तरी सामान्य व्यवहारज्ञान वापरा,’ अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना फटकारलं आहे.
कपिलला याआधीही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणसाठी त्याने एक पोस्ट लिहिली होती. त्यावरूनही नेटकऱ्यांनीही त्याच्यावर जोरदार टीका केली होती. तेव्हासुद्धा कपिलने या टीकाकारांना उत्तर दिलं होतं.