मराठी, हिंदी सिनेसृष्टी, रंगभूमी आणि टीव्ही मालिका गाजवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) सकाळी शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार पोहोचले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा परचुरेंच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. अष्टपैलू कलाकाराला अंतिम निरोप देताना कलाकार भावूक झाले. अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आमच्या पिढीतले पु. ल. देशपांडे गेलेत, अशा शब्दांत विजय पाटकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
“चांगल्या माणसाबरोबर काम करण्याचा योग मला आला होता. आठवणी खूप असतात. ‘व्यक्ती आणि वल्ली’ आम्ही सोबत केलं होतं. इतर सिनेमेही केले आहेत. समविचारांमुळे शूटिंगदरम्यान आमची चांगली मैत्री झाली होती. माझी सर्वच कलाकारांना विनंती आहे की, स्वत:ची काळजी स्वतः करायला हवी. या जगात टिकायचं असेल तर स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. वेळ निघून गेल्यावर काही अर्थ नाही. चांगली माणसं निघून जातात यासारखी दुर्दैवी घटना नाही असं मला वाटतं,” अशा शब्दांत अरुण नलावडे व्यक्त झाले.
“अतुल परचुरे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. विनोद कसा मांडावा याचं वकुब असलेला व्यक्ती आज निघून गेला. किलबिलपासून व्यक्ती आणि वल्लीपर्यंत, पुलंसारख्या लेखकांबद्दल केलेलं त्यांचं प्रदर्शन खूप मोठं होतं. त्यांचं असं अवेळी जाणं आम्हा सर्वांना चटका लावून गेलंय,” अशा भावना भाजपचे आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.
“ही माझी व्यक्तिगत क्षती आहे. आम्ही दोघांनी 1984 साली करिअरची सुरुवात केली होती. चाळीस वर्षे आम्ही सोबत होतो. आम्हाला सोबत प्रोजेक्ट करायचा होता. तो एका नाटकासाठी रंगीत तालीमसुद्धा करत होता. नाटकातून पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज झाला होता. पण आता जे झालं ते खूपच दु:खद आहे,” असं महेश मांजरेकर म्हणाले.
“कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकाचा संबंध आला, तेव्हा आपल्याला असं करता येईल का शिकत गेलो. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ते इतक्या मोठ्या आजारातून बाहेर पडलेत. त्यांची जाण्याची ही वेळ नव्हती. तो खूप मोठा नट होता. इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान झालंय,” अशा शब्दांत अभिनेता श्रेय तळपदेनं दु:ख व्यक्त केलंय.
“गेले दीड-दोन महिन्यात हेच धक्के आम्ही सहन करतोय. आमच्या पिढीतले पु. ल. देशपांडे गेलेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” अशा शब्दांत विजय पाटकर यांनी श्रद्धांजली वाहिली.