Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी 5’ च्या घरातील मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपला आहे. तब्बल 67 दिवसांनी वर्षा यांनी घराचा निरोप घेतला. सध्या सर्वात चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे ‘बीबी हाऊस पार्टी ‘ सुरु असताना बिग बॉसने सर्वांना मोठा धक्का दिला. मिडवीक एलिमिनेशन जाहीर करून ‘बिग बॉस’ने पाचव्या पर्वातील टॉप-6 स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली आणि वर्षा उसगांवकर यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला.
शेवटच्या आठवड्यात वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कारण वर्षा यांनी विजेती म्हणून पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहे.
वर्षा उसगांवकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘बिग बॉस मराठी 5’ च्या घरातील प्रवासाबद्दल वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखले नाही, तर मी आपले सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला.
नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो.’ असं म्हणत वर्षा उसगांवकर यांनी सर्व टीमचे आभार देखील मानले.
पुढे वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शो मधुन तुमचा निरोप घेत आहे… पण मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील…’ माझ्या प्रिय प्रेक्षकांना…. प्रेम आणि फक्त प्रेम..!’ असं म्हणत वर्षा उसगांवकर यांनी भावना व्यक्त केल्या.
‘या’ स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत
वर्षा उसगांवकर यांनी शोचा निरोप घेतल्यानंतर ‘बिग बॉस 5’ शोला टॉप 6 स्पर्धत भेटले आहेत. अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी… या 6 स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायलं मिळणार आहे. तर कोण ‘बिग बॉस 5’ शोची ट्रॉफी स्वतःच्या नावावर करणार… याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.