मुंबई : आईने जवळपास तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणापासून मराठी बालकलाकार साईशा भोईर सोशल मीडियावर चर्चेत आहे. या प्रकरणानंतरही साईशा ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करत होती. मात्र आता तिने ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सोडल्याची माहिती समोर येत आहे. साईशाच्या कुटुंबीयांनी तिच्याबाबत हा निर्णय घेतल्याचं कळतंय. साईशा सध्या तिच्या आजी-आजोबांसोबत राहत आहे. आधी तिची आई तिला सेटवर नेऊन सोडायची आणि तिला घेऊन यायची. मात्र आजी-आजोबांना हे सर्व करणं शक्य नसल्याने साईशाने मालिका सोडली आहे.
पैशांच्या फसवणूकप्रकरणी साईशाच्या आईला अटक झाल्यानंतर निर्मात्यांनी तिला मालिकेतून काढल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना मालिकेच्या सूत्रांनी फेटाळलं. “आम्ही तिला मालिकेतून काढलंच नाही. हा तिच्या कुटुंबीयांचा निर्णय आहे. तिच्या आईच्या प्रकरणाविषयी कोणतीच चर्चा आम्ही सेटवर करत नाही. कदाचित ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात काम करत राहील. आम्हाला तिच्या भूमिकेसाठी दुसरी बालकलाकार भेटली आहे. आरोही सांबरे आता मालिकेत साईशाची जागा घेणार आहे. नवा गडी नवं राज्य या मालिकेत आता आरोही चिंगीची भूमिका साकारणार आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
साईशाची आई पूजा भोईल यांना पैशांच्या हेरगिरीप्रकरणी मे 2023 मध्ये अटक झाली होती. आता त्यांची कोठडी 7 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. नुकतंच पोलिसांनी पूजा भोईर आणि विशांत भोईर यांची मालमत्तासुद्धा जप्त केली. साईशाची आई पूजा भोईर याच मुलीचं सोशल मीडिया पेज सांभाळत होत्या. या प्लॅटफॉर्मचा गैरफायदा घेत त्यांनी गुंतवणूकदारांशी संपर्क साधला. मात्र नंतर त्यांनी गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यास नकार दिला.