मुंबई : अभिनेते भरत जाधव (Actor Bharat Jadhav) यांचे नाव उच्चारले की, ‘गोड गोजिरी, लाज लाजिरी…’ हे गाण किंवा ‘गलगले निघाले’, ‘जत्रा’, ‘पछाडलेला’ असे चित्रपट लगेच डोळ्यासमोर उभे राहतात. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि अफाट ऊर्जेने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर भरत जाधव विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट या विशेष असतात. यावेळी त्यांनी आपल्या करिअरमध्ये शाहीर साबळे यांनी कशा प्रकारे साथ दिली, याच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
शाहीर साबळे यांच्या आठवणी शेअर करताना एक खास पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी शाहीर साबळे यांचे आभार मानले आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असते.
या पोस्टमध्ये भारत जाधव म्हणतात, ‘साल 1985, नुकताच 12वी पास झालो होतो. शाहीर साबळे यांचे जावई मंगेश दत्त हे माझ्या भावाचे मित्र होते आणि महाराष्ट्राची लोकधारा मध्ये नृत्यात सहभाग घेण्यासाठी त्याला विचारत होते.
तो कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला जाणार होता. भावाने नकार दिला पण नृत्याचा कोणताही गंध नसताना मी होकार दिला. का ? कारण चमकायला मिळेल म्हणून. आणि तो क्षणच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. मी स्वतःला नेहमी नशीबवान समजतो की करिअर च्या प्रत्येक महत्वाच्या स्टेपवर मला चांगली माणसं भेटत गेली.आणि त्यातील सर्वांत महत्त्वाची आणि पहिली व्यक्ती म्हणजे मा.शाहीर साबळे..!’
महाराष्ट्राची लोकधारा मध्ये सुरुवातीला मी लोकनृत्य करत होतो. कोरसला गात होतो. मग हळूहळू आमचा एक ग्रुप तयार झाला, शाहिरांचा नातू केदार शिंदे, अंकुश चौधरी, संतोष पवार,अरुण कदम आणि मी. एकदा धाडस करून आम्ही ‘दादला नको गं बाई’ हे भारुड आम्ही करू का, म्हणून शाहिरांना विचारलं. हे भारुड स्वतः शाहीर सादर करायचे पण त्यांनी आम्हाला ती संधी दिली. विंगेत बसून आमचं संपुर्ण भारुड पाहिलं आणि इथून पुढे तुम्हीच हे करत चला म्हणून सांगितलं. स्वतः शाहिरांनी एवढा विश्वास दाखवल्यामुळे आमचाही कॉन्फिडन्स वाढला. शाहिरांना पाहत पाहतच आम्ही विनोदाचं टायमिंग, विनोदाच्या बारीक बारीक जागा कशा काढायच्या हे शिकलो.
आमच्या सारख्या अनेक नवोदितांना त्यांनी रंगमंचावर मुक्तपणे वावरू दिलं, एवढा प्लॅटफॉर्म दिला.एक नट म्हणून मला घडवण्यात तर शाहिरांचा मोठा वाटा होताच पण एक माणुस म्हणूनही समृद्ध झालो ते त्यांच्याकडे बघूनच. लोकधारा च्या वेळेस कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर सामानाचीने आण आम्ही मुलंच करायचो. सामान उतरवल्या नंतर शाहिरांच्या मिसेस (माई) कधीही जेवू घातल्या शिवाय आम्हाला जाऊ देत नव्हत्या. केदार जरी शाहिरांचा नातू असला, तरी आम्हालाही ते आजोबांच्याच स्थानी होते. आमच्यावरही ते तेवढीच माया करायचे. त्यांचा धाकही वाटायचा आणि आधारही. आमच्या घरी कला क्षेत्रातील कोणीही नव्हतं. अभिनय आणि आमचा दुरदूरपर्यंत संबंध नव्हता. परंतु तरीही माझ्या आई वडिलांनी मला लोकधारामध्ये जाण्यापासून कधीच रोखलं नाही कारण त्यांना खात्री होती की, हा शाहिरांकडे जातोय म्हणजे नक्कीच काही तरी चांगलं करतोय.
आयुष्यात निर्भय असण्याइतकं सुख कशातच नसतं आणि शाहीर तसेच निर्भय होते सिंहाप्रमाणे. काळाच्या कितीतरी पुढे जाऊन ते विचार करायचे. गेल्या काही वर्षात आपण मराठीच्या, मुंबई मधील मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलतोय. पण शाहिरांनी हे 50 वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. “मराठीचा मळवट पुसला, राहिली फक्त टिकली। आम्ही आमच्या हाताने, मुंबई सारी फुकली”.
साल 2023 हे शाहिरांचं जन्म शताब्दी वर्ष असणार आहे. आणि तो योग साधून केदार शाहिरांचा जीवनपट आपल्या भेटीस घेऊन येत आहेत…”महाराष्ट्र शाहीर”. केदारने जितक्या जवळून शाहिरांना पाहिलंय, अनुभवलंय, आत्मसात केलंय तितकं ईतर कोणीही नाही. आणि मला खात्री आहे की हा जीवनपट केदारची सर्वोत्कृष्ट कलाकृती असेल.
‘एखाद्या सेलिब्रिटीच्या मृत्यूला तमाशा बनवला जातो’, अनुष्का शर्माने शेअर केली झाकीर खानची ‘ती’ पोस्ट
‘रोमान्स किंग’ शाहरुख खान पुण्यात, आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात!