मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले असून यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला.
पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ही धडाडीची कारवाई केलीये एनसीबीचे ‘डॅशिंग’ अधिकारी समीर वानखेडे यांनी.. समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिचे पती आहेत. आपल्या पतीची ही धडाकेबाज कामगिरी पाहून अभिनेत्रीने त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
आपल्या पतीचं अर्थात समीर वानखेडे यांचं कौतुक करताना क्रांती रेडकर म्हणते की, एक पत्नी म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांचं कौतुक पाहून नेहमीच समाधान वाटतं. समीर नेहमीच आपल्या कामात गर्क असतात. कधीकधी कामाच्या व्यापापायी ते झोप देखील घेत नाहीत, तर कधीकधी अवघ्या 2 तासांच्या झोपेने त्यांचा दिवस सुरु होतो. ड्युटी संपवून घरी आले तरी त्यांचं काम मात्र सतत सुरूच असतं. घरात देखील त्यांना त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही याची काळजी आम्ही घेतो.
समीर आपल्या कामाशी खूप एकनिष्ठ आहेत, त्यामुळे घराचा संपूर्ण डोलारा हा माझ्यावर असतो. आमच्या मुलांना देखील त्यांच्या बाबांची आठवण येत असते. मात्र, घराकडे लक्ष देऊन काम पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या कामाची प्रायव्हसी जपणे, हे त्यांच्या इतकेच आमचे कर्तव्य देखील आहे आणि त्यांच्या या कामात त्यांना यश मिळते हे पाहून आम्हालाही खूप अभिमान वाटतो, असं क्रांती म्हणाली.
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.
समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फुल थ्री धमाल’ अशा अनेक सिनेमात झळकली आहे.
जो अख्खं जहाज खरेदी करु शकतो, त्याला ड्रग्ज विकायची गरज काय, आर्यन खानच्या युक्तीवादातील 10 मुद्दे
ड्रग्ज प्रकरणात अटकेनंतरही पालकांकडून पोरांचे लाड, बर्गर घेऊन आई NCB ऑफिसबाहेर https://t.co/RfTERq2wAX #AryanKhan | #NCB | #Burger | #DrugsParty
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021