मुंबई : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘नो बिंदी नो बिझनेस’ या ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. आता हा नेमका प्रकार काय? हे जाणून घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. सध्या दिवाळी सणाचे दिवस सुरु झाले आसेत, अशातच या सणाला पूरक अशा दागिन्यांच्या जाहिराती देखील वृत्तपत्र आणि होर्डिंगच्या माध्यमातून सुरु झाल्या होत्या. यावर असलेल्या मॉडेल्सच्या कपाळावर ‘टिकली’ नसल्याने, हा वाद सुरु झाला होता.
कपाळावर टिकली असणं हा हिंदू धर्माचा एक भाग असल्याचे म्हटले गेले. तर, दिवाळी हा देखील हिंदू सण असून, असप्रकारे अपमान होत असल्याचा दावा केला जात होता. याविरोधात लेखिका शेफाली वैद्य यांनी ‘नो बिंदी नो बिझनेस’ ही मोहीम सुरु केली होती. मात्र, याच बरोबर आता त्यांनी आपला मोर्चा एका कार्यक्रमाकडे वळवला आहे. प्रख्यात कवी वैभव जोशी आणि संदीप खरे यांच्या ‘इर्शाद’ या कार्यक्रमावर त्यांनी तोफ डागली आहे.
प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि वैभव जोशी हे त्यांच्या कवितांचा एक कार्यक्रम करतात, ज्याचे नाव इर्शाद’ असे आहे. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम रसिकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे. दरम्यान, आता एका आयोजकाने त्यांचा हाच कार्यक्रम दिवाळी पहाटच्या निमित्ताने आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमाचे नाव ‘इर्शाद’ वाचताच, मराठी काव्यवाचनाला उर्दू नाव का असं म्हणत शेफाली वैद्य यांनी जोरदार टीका केली. यावरून आता सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगलेला पाहायला मिळतोय.
या कार्यक्रमाची जाहिरात पोस्ट करत शेफाली वैद्य लिहितात, ‘किती ती गंगा-जमनी तेहजीबची आयोजकाला काळजी! दिवाळी पहाटच्या ह्या कार्यक्रमाला शुद्ध मराठीत ’काव्यवाचन’ म्हणता आलं असतं, पण प्रत्येक शब्दाला उर्दूची फोडणी देणं म्हणजेच क्लब वालं ‘कल्चर’ असतंय बघा.
मराठी वृत्तपत्राने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला शुद्ध मराठीत ’काव्यवाचन’ असं लिहीणं म्हणजे मणूवादी बुरसटलेली ’संस्कृती’, तिचं ‘कूल’ जश्न-ए-कल्चर मध्ये रूपांतर करायचं तर नऊवारीतल्या मूळ मराठी संस्कृतीच्या कपाळीचं कुंकू पुसून तिच्या चेहेऱ्यावर ‘इर्शाद’ ची टोकदार, मेंदीने लाल रंगवलेली दाढी चिटकवलीच पाहिजे. ते केल्याबद्दल आयोजकाचे मनःपूर्वक धन्यवाद, सॉरी, तह-ए-दिलसे जश्न-ए-शुक्रिया!
आता सर्व मराठी जन जश्न-ए-चिराग़च्या सुबह-ए-फजर च्या वेळी उठून उटणं- ए-खास लावून अंघोळ-ए-शाही करतील आणि मटा क्लब-ए-कल्चर च्या ह्या अभिनव कार्यक्रमाला जाऊन कबाब-ए-बीफ खाता खाता कवितांचा मजा-ए-आनंद घेतील अशी आपण आशा करूया! इर्शाद!’
या वादाला आणखी तोंड फुटण्याआधीच आयोजकांनी या कार्यक्रमाचं नाव ‘इर्शाद’ बदलून ‘काव्य पहाट’ असे केले आहे. मात्र, यावरून असंतोष देखील दिसून येत आहे. या प्रकरणावर व्यक्त होताना गणेश मतकरी यांनी देखील एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, ‘संदीप खरे आणि वैभव जोशी बराच काळ वेगवेगळ्या निमित्ताने करत असलेल्या कार्यक्रमाला ‘इर्शाद’ हे नाव बदलून ‘काव्य पहाट’ करायला लागणं ही अत्यंत सिली गोष्ट आहे. मूळ नाव काव्याच्या परफॉर्मन्सशी जोडलेलं नाव आहे, शिवाय कार्यक्रम वर्षभर होतो, तो दिवाळीसाठीच केला नसल्याने ते नाव मुद्दाम खोडसाळपणा करुनही देण्यात आलेलं नाही. असल्या गोष्टींचा विजय सेलिब्रेट करताना खऱ्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतय, केलं जातय. या कार्यक्रमाला आजवर कोणत्याही मराठी माणसाने आक्षेप घेतला नव्हता, पण आज आपल्यातल्याच अनेकांना हे बरोबरच आहे असं वाटायला लागलय. अशा हार्मलेस गोष्टींना उगाचच धर्म पुढे आणून टारगेट केलं जाणं ही गोष्ट बरी नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो.’ अर्थात यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर मतमतांतर पाहायला मिळत आहे.
अनन्या पांडेने सुरु केले ‘लायगर’चे चित्रीकरण, ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यामुळे लागला होता ब्रेक!