दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट प्राइम टाइमचा शो मिळत नसल्याने चर्चेत आहे, तर आता दुसरीकडे अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिग्दर्शकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी त्यामागचं कारण सांगितलंय. ‘आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार,’ असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दिग्पाल यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
“दोन-तीन दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकाने एक पोस्ट सोशल मीडियावर शे्अर केली. त्यात त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असेल. पण माझा त्या कलाकृतीशी काहीही संबंध नसताना अप्रत्यक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझा उल्लेख करण्यात आला. हा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला म्हणून मला हा व्हिडीओ पोस्ट करणं गरजेचं वाटतंय. अनेकदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं म्हटलं जातं, पण वारंवार जेव्हा एक गोष्ट घडते तेव्हा ते खोटे आरोपही खरे वाटू लागतात. मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज किंवा शंभूराजे म्हणा ज्या ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत, त्या पूर्णपणे नतमस्तक होऊन साकारल्या आहेत. असं असताना अशा पद्धतीच्या पोस्ट लिहून त्या शेअर करून माझी रेषा मोठी हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा जो विखारी प्रयत्न सुरू आहे, तो दुर्दैवी आहे आणि ही माझी संस्कृती नाही. मी कोणाचाही विरोध किंवा निषेध करत नाही. त्यामुळे ही पोस्ट लिहिणाऱ्यांचे आणि ती शेअर करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो”, असं ते म्हणाले.
‘शेर शिवराज’ या चित्रपटाविषयीची एक पोस्ट दिग्पाल यांनी सोशल मीडियावर शेअर केली. यात शेर शिवराजची स्तुती करणारे अनेक मुद्दे लिहिण्यात आले होते. मात्र एका मुद्द्यात असं लिहिलं होतं, ‘टीव्हीच्या पडद्याआड शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा’. यावर अमोल कोल्हेंनी आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे.
अमोल कोल्हेंच्या या पोस्टनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांची जाहीर माफी मागितली. “चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट अनेक चाहते शेअर करत होते. अशातच आमच्या सोशल मीडिया टीमकडून ही पोस्ट अनवधानानं शेअर झाली. मात्र संबंधित मुद्दा लक्षात आल्यानंतर आम्ही ती पोस्ट डिलिट केली होती. डॉ. अमोल कोल्हे यांचा अपमान करण्याचा हेतू किंवा त्यांच्याबद्दल आमच्या मनात कोणताही आकस नाही. हे जाणीवपूर्वक केलेलं नाही. पण तरीही मी त्यांची माफी मागतो”, असं दिग्पाल म्हणाले.