मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. “या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक याने साकारली. एकनाथ शिंदे लोकांसाठी कसा होता ते क्षितिजने दाखवलं. हा सिनेमा होतोय. गेला सिनेमा 2022 ला सुपर हिट झाला. आनंद दिघे गेल्यानंतरही त्यांचं काम अजरामर आहे. आनंद मरा नहीं करते. आनंद दिघेंनी अनेकांचं जीवन आनंदीमयी केलं. आनंद दिघेचे फोटो अनेकांच्या घरात आहेत. अनेक कुटुंब, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना दिघे यांनी त्यांचं जीवन वाचवलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या सरकारशी आम्ही तडजोड करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“धर्मवीर 2 या चित्रपटाच्या पोस्टर लाँचसाठी अलेल्यांचं मी स्वागत करतो. मी धर्मवीर 2 या चित्रपटाला शुभेच्छा देतो. धर्मवीर आनंद दिघे हे माझे गुरू होते. त्यांच्या सावलीत मी वाटचाल सुरू केली आणि राजकारण तसेच समाजकारण शिकलो. त्यांनी हृदयावर स्थान निर्माण केले होते. आनंद दिघे हे पंचाक्षरी मंत्र होते. कुणाचेही काम असूद्या ते पूर्ण होत होते. सगळीकडे हरल्यावर माणूस तिथे पोहचत होता. कार्यकर्ते म्हणून आम्हाला आनंद होता. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा आम्ही शब्द पूर्ण करत होतो. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला आहे . त्यांचे बँकेत खातं सुद्धा नव्हतं. असे व्यक्तिमत्व राज्यात कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले”, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
“कुठलीही सत्ता नसताना जनतेच्या प्रत्येक पावलोपावली आनंद दिघे यांची आठवण येते. त्यांचे शब्द आजही कानावर पडल्यासारखं वाटतं. मी स्वत:ला मुख्यमंत्री नाही, तर राज्याचा सेवक समजतो. लोकांचे काम करतो. बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा आशीर्वाद होते”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“पहिला सिनेमा काढल्यावर लोक म्हणत होते पुढे काय? आगे आगे देखो क्या असे म्हणालो. त्यांनी संघर्ष केला आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी टोकाचा निर्णय घेत होते. लोकांच्या मागणीनुसार धर्मवीर पार्ट 2 आला आहे. प्रसाद ओक यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी आनंद दिघे साहेब यांना पाहिलं नव्हतं. त्यांची माहिती घेऊन त्यांनी त्यांची भूमिका साकारली”, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“आताचा एकनाथ शिंदे आणि पूर्वीचा एकनाथ शिंदे हा लोकांसाठी काय करत होता, हे या चित्रपटात दाखवले आहे. आनंद मरते नहीं. आनंद मरा नहीं करते. सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. हो पण सगळं खरं दाखऊ शकत नाही”, असं एकनाथ शिंदे मिश्किलपणे म्हणाले.