डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी.. या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचं नाव.. अरुण गुलाब गवळी (Arun Gawli) उर्फ डॅडी (Daddy). बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड म्हणून ओळख झाली. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं’ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. आता या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यातील अंकुश चौधरीच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे.
‘दगडी चाळ 1’ ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरं पर्व येत्या 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. डॅडी आणि सूर्याचं नातं आपण याआधीच पाहिलं आहे. डॅडींच्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, ‘डोकॅलिटी’ वापरून काम करणारा सूर्या हा डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं.
मात्र यावेळी ‘आय हेट यू डॅडी’ असं म्हणत सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय. आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय, याचं उत्तर ‘दगडी चाळ 2’ पाहिल्यावरच मिळेल. या चित्रपटात मकरंद देशपांडे ‘डॅडीं’ची भूमिका साकारत आहेत. 2015 मध्ये ‘दगळी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या.