काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित ‘विशू’ (Vishu) या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग होता, ‘ये मालवण कहा आया?’ त्यावर विशू म्हणतो, ‘यहाँ दिल में..’ या एका डायलॉगने कोकणवासीयांसह (Kokan) अनेकांची मनं जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा या सगळ्यांचंच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेलं हे मालवण (Malvan) ‘विशू’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचं दर्शन प्रेक्षकांना ‘विशू’ चित्रपटात घडणार आहे.
‘विशू’चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आलं आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणं तसं आव्हानात्मक होतं. या बेटावर मोबाईलचं नेटवर्क नव्हतं, त्यामुळे इतरांशी संपर्कात राहणं खूप कठीण होतं. त्यात चित्रीकरण बेटावर आणि बाहेर कलाकारांच्या राहण्याची सोय त्यामुळे बोटीने ये-जा करावी लागत होती. तांत्रिकदृष्ट्याही हे कठीण जात होतं. तरीही या सगळ्यावर मात करत ‘विशू’चं चित्रीकरण पूर्ण झालं.
शूटिंगच्या या अनुभवाबाबत गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले म्हणतात, “मालवणमध्ये शूट करताना एक वेगळीच मजा आली. बाजूला इतकं निसर्गसौंदर्य असताना काम करण्यातही एक वेगळाच उत्साह असतो. चित्रीकरणासाठी रोज बोटीने बेटावर जाणं दगदगीचे होतं. मात्र त्याचा कधी कंटाळा नाही आला. अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या, परंतु या जादुई बेटावर त्या अतिशय नगण्य वाटल्या. चित्रपट पाहताना प्रेक्षकही या बेटाच्या नक्कीच प्रेमात पडतील.” तर दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात की, “आपल्या महाराष्ट्रातही निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेली अनेक ठिकाणं आहेत आणि त्यापैकीच एक असलेल्या मालवणातील एका बेटाचा आम्ही चित्रीकरणासाठी विचार केला. ‘विशू’च्या निमित्ताने मालवणचं सौंदर्य प्रेक्षकांसमोर येईल. ही एक प्रेमकहाणी आहे, जी मालवणच्या निसर्गसौंदर्यात अधिकच खुलणार आहे.”
श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केलं आहे. हृषिकेश कोळी यांनी विशू’चं संवाद, पटकथालेखन केलं असून या चित्रपटाला हृषिकेश कामेरकर यांनी संगीत दिलं आहे. तर मंगेश कांगणे यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. ‘विशू’चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केलं आहे. या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हेही वाचा:
ट्विंकल खन्नाने The Kashmir Filesची उडवली खिल्ली; म्हणाली ‘आता मीसुद्धा..’