मुंबई : आपल्या भागातील, आपल्या बोली भाषेतील गाण्यात काम करण्याची आपली इच्छा आहे, तशी ऑफर जर आपल्या आहिराणी कलाकार आणि निर्मात्यांकडून आली, तर आपण आहिराणी गाण्यात नक्की काम करु, असं गौतमी पाटील हिने म्हटलं आहे. मराठीची बोली भाषा असलेल्या आहिराणी गाण्यांना सध्या यूट्यूबवर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे. या निर्मितीत सचिन कुमावत आणि विनोद कुमावत हे कलाकार आणि निर्माता म्हणून आघाडीवर आहेत, यांनी मनावर घेतलं तर आहिराणी गाण्यात गौतमी पाटील हिला संधी दिली तर आहिराणी गाण्यांमध्ये एक नवा अविष्कार होण्याची संधी नाकारता येत नाही. आहिराणी प्रेक्षकांसाठी सचिन कुमावत आणि गौतमी पाटील यांचं गाणं ही एक नक्कीच मोठी पर्वणी असेल. पण याबाबतीत इगो बाजूला ठेवून दोन्ही कलाकांरांनी गाण्याच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याची नक्कीच गरज आहे.
सांगलीत एका कार्यक्रमात ‘टीव्ही ९ मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीशी बोलताना गौतमी पाटील हिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आहिराणीतून जर मला कुणी गाण्यात काम करण्याची ऑफर दिली तर आपण नक्की काम करण्यास उत्सुक आहोत. आपल्या भागातील आणि आपल्या बोलीभाषेत काम करायला कुणाला आवडणार नाही? मला देखील आहिराणी गाण्यात काम करण्यास आवडेल, असं गौतमी पाटील हीने आनंद व्यक्त करताना म्हटलं आहे.गौतमी पाटील हिने आहिराणी गाण्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सचिन कुमावत गौतमी पाटील हिला गाण्यात काम करण्याची ऑफर देतील का? यावर हे सर्व अवलंबून आहे.
आहिराणीत भैय्या मोरे या गायकाच्या आवाजालाही मोठी लोकप्रियता आहे.अंजना बर्लेकर या गायिकेचं, देख तुन्ही बायको कशी नाची रायनी, हे सर्वात हिट गाणं राहिलेलं आहे. जगदीश संधानशिव यांच्या आवाजालाही मोठी किंमत आहिराणी गाण्यात आहे. मात्र आहिराणी कलाकार हे मराठी मीडियाशी संपर्कात नसतात, आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत, त्यात मीडियाला द्यायला वेळ नसल्याचंही काही कलाकार खासगीत बोलून दाखवतात. पण मुंबईतील आहिराणी बोली भाषेतील पत्रकार या कलाकारांच्या गाण्यांच्या लोकप्रियतेवर आणि घडोमोडींवर नजर ठेवून असतात.
गौतमी पाटील या मूळच्या सिंदखेडा, जिल्हा धुळे येथील आहेत. पण खूप लहानपणीच त्यांना कठीण परिस्थितीमुळे पुण्यात जावे लागले, तेथे देखील त्यांच्यासमोरचा संघर्ष चुकला नाही. गौतमी लोकप्रिय होण्याआधी अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत होती. गौतमीला जेवढ्या कमी वयात लोकप्रियता मिळाली, त्यापेक्षाही कमी काळात, पण जास्त तिच्या नशिबात अडचणी आल्या.
सचिन कुमावत हे अहिराणी गाण्यांच्या इंडस्ट्रीतलं सर्वात मोठं आणि यशस्वी नाव आहे. सचिन कुमावत हे अहिराणी कलाकारांना प्रोत्साहनही देतात. ते अनेक अहिराणी कलाकारांना मतदही करतात, अशी खान्देशात चर्चा आहे. त्यांचं प्रत्येक गाणं यूट्यूबवर हिट होत आलं आहे. त्यामुळे गौतमी आणि सचिन कुमावत यांनी एकत्र येऊन अहिराणी गाणं तयार केलं तर त्याला तुफान प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.