प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ (Ananya) हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘अनन्या’ची सकारात्मक कहाणी प्रत्येक कानाकोपऱ्या पोहोचावी, याकरता या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या (Hruta Durgule) म्हणजेच ‘अनन्या’च्या आयुष्यात सर्वात जवळची गोष्ट म्हणजे तिची जिवाभावाची सायकल. या दोघांचं एक अनोखं नातं आहे. खरंतर प्रत्येक सायकलस्वाराचे त्याच्या सायकलसोबत एक वेगळंच नातं असतं. नुकतीच हृतानेही कल्याणमध्ये (Kalyan) काही सायकलस्वारांसोबत सायकल चालवली.
या अनुभवाबद्दल हृता दुर्गुळे म्हणते, “एका सायकलस्वाराच्या आयुष्यात सायकलचं वेगळंच महत्व असतं. ‘अनन्या’च्या आयुष्यातही सायकल तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी आहे. त्यामुळे मला सायकल चालवताना पुन्हा एकदा ‘अनन्या’ जगता आली. एक वेगळाच अनुभव आला. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी एक वस्तू असते जी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होते. ‘अनन्या’ आणि सायकलचं असलेलं नातं खूप वेगळं आहे. तुम्हाला ‘अनन्या’ पाहिल्यावर ते समजेलच. मुळात सायकलस्वार त्याचे ध्येय गाठण्यासाठी आपली संपूर्ण मेहनत पणाला लावतात. त्यांच्यात ध्येय साध्य करण्याची अफाट उर्जा असते. अशीच सकारात्मक उर्जा आपल्याला ‘अनन्या’मध्ये पाहायला मिळणार आहे.”
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘अनन्या’ची भूमिका साकारणारी हृता दुर्गुळे आपल्या अनुभवाबद्दल सांगते, “ज्यावेळी ‘अनन्या’साठी माझी निवड झाल्याचा फोन आला, आधी मला विश्वासच बसत नव्हता. काही दिवस हे खरं आहे, हे मनाला समजवण्यात गेले. कारण ‘अनन्या’च्या निमित्ताने माझं चित्रपटात पदार्पण होणार होतं. पहिलाच चित्रपट एवढा मोठा, याहून आनंदाची गोष्ट कोणती असूच शकत नाही. या भूमिकेसाठी मला शारीरिक, मानसिक अशा सगळ्याच गोष्टींवर काम करावं लागलं. प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अर्थात यात मला अनेकांची साथ लाभली. ‘अनन्या’चा प्रवास माझ्यासाठी सुद्धा खूप आव्हानात्मक होता. या चित्रपटातून म्हणजेच ‘अनन्या’कडून मी काही गोष्टी शिकले, त्या म्हणजे आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानून आयुष्य पुढे न्यायचं आणि छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. आयुष्यात हे जमलं तर आपलं आयुष्य सुखकर होतं.”