कॅसेटमध्येच नव्हे तर मोर्चा, आंदोलनातही गाणी म्हटली जाऊ लागली; किरण सोनावणेंचे हे पैलू वाचाच!

| Updated on: Aug 19, 2021 | 7:54 AM

गायक आणि गीतकार म्हणून स्वत:ची जडणघडण करताना किरण सोनावणे यांनी स्वत: भोवती कोणतीही चौकट आखून घेतली नाही. (kiran sonavane)

कॅसेटमध्येच नव्हे तर मोर्चा, आंदोलनातही गाणी म्हटली जाऊ लागली; किरण सोनावणेंचे हे पैलू वाचाच!
kiran sonavane
Follow us on

मुंबई: गायक आणि गीतकार म्हणून स्वत:ची जडणघडण करताना किरण सोनावणे यांनी स्वत: भोवती कोणतीही चौकट आखून घेतली नाही. त्यांनी आपली गीते आणि गायकी सुधारण्यासाठी सतत ज्येष्ठ कवी, गीतकार आणि गायकांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन केलं आणि स्वत:ला अंतर्बाह्य घडवलं. त्याचं प्रतिबिंब त्यांची गाणी आणि गायकीतही उमटले. (kiran sonavane make own singing style, know details)

श्रावण यशवंतेंशी ओळख झाली आणि…

हृदयनाथ सिन्नरकरांनी किरण सोनावणे आणि साजन शिंदे यांची प्रसिद्ध कवी श्रावण यशवंते यांच्याशी ओळख करून दिली. त्या काळात कलावंतांचा बौद्ध कला साहित्य संघ फॉर्मात होता. त्याचे अध्यक्ष हृदयनाथदादाच होते. या कलावंतांची श्रावण यशवंतेंच्या घराच्या अंगणातील फणसाच्या झाडाखाली मैफल जमायची. चर्चा व्हायची. यशवंतेंनीही सोनावणे यांची गाणी आणि कविता ऐकल्या. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केलं. कधी कधी तर सोनावणेंना एखादी ओळ देऊन ते गाणं पूर्ण करायला सांगायचे. एकदा त्यांनी सोनावणेंना ‘तुझको किसी की नजर न लग जाये’ आणि ‘एक दिन तेरा भी आयेगा’ या दोन ओळी देऊन स्वतंत्र गाणी लिहायला सांगितली. तेव्हा सोनावणे यांनीही हे आव्हान स्वीकारत आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं.

तुझको किसी की नजर न लग जाए,
इतनी बनठनकर बाहर न जाना,
खडे रहते है आशिक जहाँ पर,
भूल से तू बाहर न जाना…

आणि

आज तू दु:ख के गीत गाता है,
कल खुशी के गायेगा,
एक दिन तेरा भी आयेगा…

सोनावणेंनी एका ओळीवरून लिहिलेली ही दोन्ही गीते यशवंतेंना खूप आवडली. त्यांनी सोनावणेंना लिहीत राहा. थांबू नकोस, असा सल्ला दिला. यशवंतेंनी अनेक कवी गायकांना घडवले होते. अनेकांना त्यांचा दीर्घ सहवास लाभला. मात्र, सोनावणेंना त्यांचा फार सहवास लाभला नाही. यशवंते यांचे अकस्मात निधन झालं. यशवंतेंच्या निधनानंतर सोनावणे यांनी त्यांच्यावर गीत लिहिलं होतं. त्यातून या दोघांचा ऋणानुबंध किती घट्ट होता हे दिसून येतं.

स्फुंदू स्फुंदूनी बोलती पाहा फणसाची पानं,
नाही ऐकू येत आता, इथं श्रावणाचं गाणं…

वामनदांदावर प्रचंड गीते लिहिली

श्रावण यशवंतेंप्रमाणेच सोनावणे यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्यावरही अनेक गीते लिहिली आहेत. एक गीत संग्रह प्रकाशित होईल एवढीही गीते आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल मनापासून आदर वाटला की त्याच्याबद्दल लिहिणं सोपं होतं, एवढं साधं सोप्पं त्यांचं तत्वज्ञान आहे.

होते पुरुषाची बायको बाई,
त्याच्या बाळाची बनते आई,
तरी बाईला किंमत नाही गं,
इथे समाजामधी…
तिचे म्हणायला दोन दोन घरं,
एक माहेर, एक सासर,
त्यातलं एकही नसतं खरं,
इथे समाजामधी…

‘शेजारीण सखेबाई’ या गाण्याच्या चालीवर बांधलेलं आणि गायिका शकुंतला जाधव यांनी गायलेलं हे गाणं त्या काळात खूपच लोकप्रिय झालं होतं. खास करून हे गाणं मोर्चा, आंदोलनता गायलं जायचं.

नवरी बनली बाय लेक लाडकी रमा,
भावाची गं ताय लेक लाडकी रमा,
लय लाडाची नऊ वरसाची सासरला जाय,
लेक लाडकी रमा…

माता रमाईवरील त्यांचं हे गीत ग्रामीण भागात खूप गाजलं होतं. त्यामुळे सोनावणे हे चांगलेच लोकप्रियही झाले होते. (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (kiran sonavane make own singing style, know details)

संबंधित बातम्या:

आई सोंगणी करताना गायची, मुलगा कोरस द्यायचा; किरण सोनावणेंचा गायक म्हणून घडतानाचा रंजक प्रवास

थिएटरमध्ये गाण्याची पुस्तके, खाद्यपदार्थ विकले, डोअर किपरचा गायक कसा झाला?, वाचा किरण सोनावणेंचा प्रवास!

लिहिता-वाचता येत नव्हतं, पण जिद्दीने शिकले, काचवादक ते शाहीर म्हणून उदय; वाचा एका शाहिराची कथा

(kiran sonavane make own singing style, know details)