मुंबई: जुन्या कलावंतांनी अत्यंत गरीबीचा सामना करत स्वत:ला घडवलं. स्वत:च्या बळावर कलापथके स्थापन केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यातील प्रसिद्ध गायक सिद्धार्थ मुकुंद जाधव हे त्यापैकीच एक. अनंत अडचणीचा सामना करत नाव लौकिकास आलेल्या सिद्धार्थ जाधवांच्या आयुष्यावर टाकलेला हा प्रकाश. (know about marathwada’s singer siddharth mukund jadhav)
जग प्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी खुपटा हे गाव आहे. जेमतेम दीडशे लोकवस्तीचं हे गाव आहे. या गावात प्रसिद्ध गायक सिद्धार्थ जाधव यांचा जन्म झाला. जन्म साल अंदाजे 1944. वडील मुकुंदराव जाधव आणि आई सीताबाई मुकुंद जाधव. दोघेही अडाणी. त्यामुले सिद्धार्थ जाधव यांचा जन्म कोणत्या तारखेला आणि कोणत्या महिन्यात झाला याची काहीच माहिती नाही. एकदा शाळेत त्यांना शिक्षकाने जन्म तारीख विचारली. त्यावेळी श्रावण महिन्याच्या आधी आखाडात (आषाढ) अमावस्येच्या आधी जन्म झाल्याचं त्यांनी मास्तरांना सांगितलं. मास्तरांनी मग अंदाजेच 13 ऑगस्ट 1944 ही त्यांची जन्म तारीख टाकून दिली. फाटकं पोतं, तुटकी पाटी आणि लेखणी घेऊन ते शाळेत जात होते. शाळेत त्यांना सर्व मुलांमध्ये बसवले जात नव्हते. शाळेतील मुलांच्या मागे पाच फुटाच्या अंतरावर त्यांना शाळेत बसवलं जात होतं.
औरंगाबाद हे निजामाच्या अधिपत्याखाली होतं. त्यामुळे शाळेत ऊर्दू शिकवलं जात होतं. शिकणारा मास्तरही मुस्लिम समाजातील होता. त्यामुळे मास्तर सर्व विद्यार्थांना तीन वेळा नमाज पठण करायला लावत असे. गावात त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतलं. नंतर अजिंठा गावी बारादरी येथे इयत्ता 10वीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यासाठी त्यांना आठ आठ मैल पाय तुडवीत जावं लागत होतं. मात्र, गरीबीमुळे पुढे त्यांनी दहावीला असतानाच शाळा सोडली.
त्यानंतर पाटलाकडे 15 रुपये महिन्यावर गुरे चारण्याचं काम ते करू लागले. तेव्हा त्यांचं वय होतं 12 ते 13 वर्ष होतं. त्यावेळी बौद्धवाड्यात बैठक भरायची. वडीलधारी मंडळी शेकोटी पेटवून चिलमीचा झुरका घेत गप्पा मारत बसायचे. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी गप्पा निघत. त्या गप्पा सिद्धार्थ जाधव कान देऊन ऐकत. बाबासाहेबांचा सांगावा हे लोक एकमेकांना सांगत असंत. मेलेली ढोरं ओढू नका, स्वच्छ राहा, शहराकडे या, मुलांना शिकवा, फाटलेले कपडे स्वच्छ धुवून, शिवून अंगात घाला, असं बाबासाहेब सांगायचे. त्यावरच ही मंडळी चर्चा करायची. त्यामुळे कोण बाबासाहेब? ते जे सांगतात ते खरं आहे का? असा प्रश्न जाधव यांना पडू लागला आणि तेव्हापासूनच त्यांचं बाबसाहेबांबद्दलचं आकर्षण वाढू लागलं.
गुरंढोरं राखून काही होणार नाही, हे माहीत असल्याने जाधव यांनी शिवणकाम शिकून घेतलं. मावशी राहत असलेल्या लोणी गावात ते शिवणकाम शिकले. हे ऐकून त्यांच्या वडिलांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी जाधव यांना 150 रुपयांची शिलाई मशीन घेऊन दिली. पण नवा धंदा शिकूनही फायदा झाला नाही. शेवटी जात आडवी आली. विटाळ होईल म्हणून त्यांच्याकडे कपडे शिवायला कुणी येत नसे. मग बौद्धवाड्यातील लोकांचेच ते कपडे शिवू लागले.
त्याकाळी अजिंठ्याहून घाटनांद्र्याचे शिरसाठ कलावंताचा जलसा घेऊन आले होते. खुपट्यात जाहीर सभा झाल्यानंतर रात्रभर शिरसाठ यांच्या जलश्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 1961 मध्ये गावात पहिली भीम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी 10 ते 12 जणांचे लेझिम पथक तयार केले. गावागावत जाऊन लेझिमचा खेळ दाखवणं सुरू झालं. त्यानंतर भादोल्यातून प्रभाकर गवई यांचं कलापथक गावात आणलं. त्याचवेळी जाधव वेडीवाकडी ढोलकी वाजवायला लागले. त्यांचे चुलत भाऊ सदाशिव जाधव हे दिंडीत पखवाज वाजवायचे. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि सिद्धार्थ जाधव ढोलकी वाजवू लागले. त्यानंतर त्यांनी स्वत:चे कलापथक तयार केलं. एक ढोलकी, एक तुणतुणे आणि झांज असं वाद्य घेऊन हे कलापथक जयंतीच्या काळात गावागावात जाऊन कार्यक्रम करू लागलं. मुलामुलींना शाळेत पाठवा, महारकी सोडा, बाबासाहेबांसारखे शिका, असं प्रबोधन या कलापथकातून सुरू झालं. (know about marathwada’s singer siddharth mukund jadhav)
संबंधित बातम्या:
विष्णू शिंदे : वंचित कलावंतांच्या मानधनासाठी झटणारा गायक!
मराठवाडा पेटलेला असतानाही समाजप्रबोधन; चळवळ्या गायक विष्णू शिंदे!
आजोबा-पणजोबा पोतराज, वडील चरित्र गायक, नोकरीचा कॉल फाडला; वाचा, विष्णू शिंदेंची कहाणी
(know about marathwada’s singer siddharth mukund jadhav)