मुंबई: प्रशांत अम्बादे यांनी अनेक दर्जेदार गाणी लिहिली. त्यांची अनेक गाणी गाजली. एक गाणं लिहिताना तर ते स्वत: ढसढसा रडले होते. इतके ते संवेदनशील गीतकार आहेत. या क्षेत्रात वावरताना त्यांना अनेक चांगले अनुभव आले. तर काही वेळा त्यांना कटू अनुभवांनाही सामोरे जावं लागलं. काय होते हे अनुभव? त्यांनी या अनुभवांचा कसा सामना केला? वाचा सविस्तर. (know what happened in Lyricist prashant ambade life)
नागपूरचे प्रसिद्ध गायक नागोराव पाटणकर यांना सुद्धा अम्बादे साथ द्यायचे. नागोराव मोठे कवी आणि गायक होते. त्यांना कवी राजानंद गडपायले आणि अम्बादे हे गाणी पुरवायचे. दोन्ही गीतकारांकडून गाणी मिळू लागल्याने नागोरावांनी गाणी लिहणं बंद केलं. निधनाच्या सहा महिन्यापूर्वी नागोरावांनी अम्बादेंना जवळ बोलावून एक विनंती केली. प्रशांतराव, मी गाणं सोडतोय. माझ्या मुलाला (प्रकाश पाटणकर) दीक्षाभूमीवर गायला बसवून मी पाठी बसून साथ करणार आहे. पण तुम्ही माझ्या मुलाला गाणं देत पुरवीत चला, असं नागोरावांनी अम्बादे यांना सांगितलं. नागोरावांच्या निधनानंतर त्यांची दोन मुलं किरण आणि प्रकाश पाटणकर स्टेजवर आली ती अम्बादेंची गाणी घेऊनच.
अम्बादे हे अत्यंत संवेदनशील गीतकार आहेत. त्यांनी थांबा थांबा जाळं टाका… हे गाणं लिहिलं होतं. प्रसिद्ध गायक कृष्णा शिंदे हे गाणं अत्यंत तन्मयतेने आणि भावनाविवश होऊन गायचे. त्यांचं गाणं ऐकून समोरचा रसिक वर्गही हेलावून जायचा. विशेष म्हणजे हे गाणं लिहितांना स्वत: अम्बादे रडले होते. ही आठवण सांगतानाही ते गहिवरून गेले होते.
अम्बादे यांनी अनेक गाणी लिहिली. त्यांच्या गाण्याचं कौतुक झालं. अनेक गाणी गाजलीही. पण त्यांचं एक गाणं त्यांच्या मनात नेहमी घर करून राहिलं. त्याला कारणही तसंच होतं.
बुद्धाला प्रभाती वंदन करावे,
नित्य पंचशीला आचरण करावे…
हेच ते गीत. या गाण्यावर स्वत: प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले प्रभावीत झाले होते. राजाभाऊंनी हे गाणं आवडल्याचं अम्बादे यांना सांगितलं होतं.
अम्बादे यांनी भीम गर्जना या सिनेमात गाणी लिहिली होती. ही गाणी सिनेमात आहे. मात्र, निर्मात्याने गीतकार म्हणून त्यांचं नाव दिलं नाही. निर्मात्याने सर्व गाणी त्यांच्या मुलीच्या नावावर खपवली. त्यामुळे अम्बादे प्रचंड संतापले होते. या प्रकारामुळे ते कोर्टातही जाणार होते. मात्र, माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे हे प्रकरण मिटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
सबसे ये बढकर भीमराव आंबेडकर,
सुनो महामानव की अमर कहानी…
रोते है सब गम के मारे,
बहे असूवन की धार,
बाबा हमारे छोड चले संसार…
हीच ती दोन गाणी. प्रसिद्ध गायिका पुष्पा पागधरे यांनी ही गाणी गायली होती. विठ्ठल शिंदे यांनी या गाण्यांना संगीत दिलं होतं.
47 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अम्बादे मुंबईत कासारवाडीत राहायचे. प्रसिद्ध कवी, गायक नवनीत खरे यांच्या मावशीकडे ते राहायचे. त्यावेळी ते नागपूरहून मुंबईला येताना त्यांनी एक पेटी आणली होती. त्या पेटीत फक्त कागदं अन् कागदं होते. त्यावर त्यांनी असंख्य गाणी लिहिली होती. तब्बल 15 वर्षात लिहिलेली ही गीतं होती. ही पेटी तशीच खरेंच्या मावशीकडे ठेवून ते दिवाळीनिमित्त पुण्यात बहिणीकडे गेले. दिवाळीनंतर ते पुन्हा मुंबईत आले. पण त्यांना पेटी सापडत नव्हती. त्यामुळे त्यांनी मावशीकडे चौकशी केली. तेव्हा मावशीने सांगितलेलं ऐकून त्यांना धक्काच बसला. आकाश कोसळल्यासारखंच त्यांना झालं. मावशीने दिवाळी निमित्त घराची साफसफाई काढली होती. साफसफाई करताना त्यांना या पेटीत कागदंच कागदं दिसली. त्यामुळे कचरा समजून त्यांनी कागदांसह ही पेटी कचरा कुंडीत फेकून दिली होती. हे ऐकून अम्बादेंच्या पोटात गोळा आला होता. कारण त्यांची 15 वर्षांची मेहनत कचऱ्यात गेली होती.
श्री भीमा गौतम बुद्धा,
दोन्ही ही जीवन शुद्धा,
जपतो मी जीवनी डोळ्याप्रमाणे,
एक जीवन विधाता, एक निर्वाणदाता….
आणि
थांबा थांबा जाळे टाका, चंदनाची ही चिता,
पाहुया डोळे भरुनी, भीम हा माझा पिता…
होरपळुनी देह निघाला,
आता तरी तू जाग,
वेड्या परि तू नको विचारू,
कुठे लागली आग… (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (know what happened in Lyricist prashant ambade life)
संबंधित बातम्या:
मुशायरे, कव्वाल्या, कीर्तनांनी गीतकार म्हणून घडवलं; कोण आहेत गीतकार प्रशांत अम्बादे?
गीतकाराचा बोल जिव्हारी लागल्याने गायकीच सोडली; शीलादेवींचा हा किस्सा माहीत आहे का?
(know what happened in Lyricist prashant ambade life)