मुंबई: योग्यवेळी योग्य सहकारी आणि मार्गदर्शक लाभल्यास जीवानाचं सोनं होतं. गायक, गीतकार गौतम संकपाळ यांच्याबाबतीतही तसंच घडलं. संकपाळ यांना योग्य गुरू आणि मित्र मिळाले. योग्य मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे ते गीतकार म्हणून घडू शकले. ते गायक म्हणून तयार झाले. काव्य क्षेत्रातही त्यांनी पाय रोवले अन् गझलेच्या प्रांतातही मुशाफिरी केली. संकपाळ यांची ही मुशाफिरी कशी घडली? त्याचा घेतलेला हा आढावा. (lyricist to ghazal writers, know about gautam sankpal)
लक्ष्मण राजगुरू हे जसे गौतम संकपाळ यांचे गुरू आहेत. तसेच महाकवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडेही त्यांचे गुरू आहेत. तर शाहीर डी. आर. इंगळे यांचे मार्गदर्शनही त्यांना मिळत असते. या मातब्बर कवी आणि गायकांचा डोक्यावर हात पडल्यानंतर संकपाळ यांना हुरुप आला. त्यांनी ‘गौतम संकपाळ आणि पार्टी’ची स्थापना केली. सात जणांचा हा संच होता. बाळू कडलक (बँजो वादक), सय्यदभाई (ढोलकवादक), भिकाजी पवार (तबला), प्रताप गवई (हार्मोनियम), शाहीर मोहिते आणि कोरस द्यायला जगताप आणि नितीन संकपाळ. असा लवाजमा घेऊन त्यांनी कार्यक्रम सुरू केले होते. पार्टी स्थापन केली असली तरी त्यांनी सर्रास कार्यक्रम केले नाही. त्यांनी मोजकेच सामने केले. पण संपूर्ण भर सिंगल कार्यक्रमावर त्यांनी भर दिला. सामन्यांमधून कमरेखालची गीते गायली जातात. त्यातून प्रबोधन होत नाही. म्हणून त्यांनी या वाटेनं जाणं सोडलं. मात्र, केवळ पैशासाठी डबल मिनिंगची गाणी लिहिल्याची आणि गायल्याचंही ते कबूल करतात.
आज काटे फुलांना छळू लागले,
रान वाऱ्यास आता कळू लागले…
या गझलमुळे त्यांची गझलकार भागवत बनसोडेंबरोबर ओळख झाली. त्यानंतर बनसोडेंबरोबरच्या गाठीभेटी वाढल्या. गझलची ओढ वाढल्याने संकपाळांनी सुरेश भटांचं सर्व साहित्य वाचून काढलं. भटांच्या गझलनामा पुस्तकामुळे रदीफ, काफियांची ओळख झाली. लगोलग त्यांनी भीमराव पांचाळे यांचे कार्यक्रमही आवर्जून पाहिले. भीमराव पांचाळेंच्या घरी जाऊन गझलांवर चर्चा केली. तसेच आपल्या काही गझलाही त्यांना दाखवल्या. त्यावर भीमरावांनी चांगला अभिप्राय दिल्याने त्यांचा हुरुप वाढला. केवळ गीते, गझलाच नव्हे तर त्यांनी कविताही लिहिल्या. ओंजळ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध कवी भीमसेन देठे यांनी त्यांच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी पत्रं लिहून ओंजळचं कौतुक केलं होतं. गझलमध्ये मोजक्याच शब्दात मोठा आशय व्यक्त करता येतो. गझलला मर्यादा असल्या तरी गझल हा प्रकार आवडत असल्याचं ते सांगतात.
महाडच्या एका कव्वाली सामन्यातील प्रसंग म्हणजे त्यांच्यासाठी धर्मसंकटासारखा होता. महाडमध्ये शीलादेवी आणि जनार्दन धोत्रेंचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संकपाळ शीलादेवींचे कवी म्हणून आले होते. गाणं कटिंग (सवालाचा जवाब देणं) करता येत असेल तरच या. नाही तर बिदागी मिळणार नाही, असं शीलादेवींनी बजावलं होतं. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. पण आपल्याला गुरुचंच गाणं कापावं लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. जनार्दन धोत्रे त्यांचे गुरू होते. गुरूचं गाणं कसं कापणार? असा प्रश्न त्यांना पडला. पण धोत्रे यांनीच हा पेच सोडवला. तू माझ्याकडे गुरू म्हणून पाहूच नको. एक स्पर्धक म्हणून बघ आणि तुझं काम कर. धोत्रेंनी दिलेल्या या धीरानंतर डोक्यावरचं ओझं हलकं झालं. त्यानंतर संकपाळ यांनी सकाळी 7 वाजेपर्यंत कार्यक्रम गाजवला. विशेष म्हणजे शीलादेवीही खूश झाल्या. त्यामुळे संकपाळ यांना बिदागीही मिळाली.
साधी भोळी राहणी रमाची,
दिवस असे काढी,
नेसून नऊवारी साडी…
मी काल पिंपळाचे पान पाहिले,
पानात मी बुद्ध भगवान पाहिले…
भीमा नदीच्या तीरावरती क्रांती न्यारी घडली,
प्राणाचीही लावून बाजी, महार जातही लढली….
माझी दैना रं केली या लाडीनं,
हिला गावाला गावाला धाडीनं…. (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (lyricist to ghazal writers, know about gautam sankpal)
संबंधित बातम्या:
15 वर्षाची मेहनत कचऱ्यात, गाणं लिहिताना ढसढसा रडले; गीतकार अम्बादेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं?
मुशायरे, कव्वाल्या, कीर्तनांनी गीतकार म्हणून घडवलं; कोण आहेत गीतकार प्रशांत अम्बादे?
(lyricist to ghazal writers, know about gautam sankpal)