‘आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 23, 2024 | 10:41 PM

"सुबोध भावे यांनी बालगंधर्व साकारला, भामिनीही साकारली, आता धैर्यधरही ते साकारत आहेत. हा देखील एक योगायोग आहे. आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं. मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस
Follow us on

संगीत मानापमान या नाटकावर आधारित भव्य चित्रपट येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत मांडलं. यावेळी त्यांनी शाब्दिक फटकेबाजीदेखील केली. “मी गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप करुन, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन ‘संगीत मानापमान’ला आलोय. आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं”, असं देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले.

“मला अतिशय आनंद आहे की, या क्षणांचा साक्षी मी होऊ शकलो. याचं कारण आहे की, 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरड घालण्याची क्षमता या संगीत नाटकामध्ये आहे. ते नाटक आज रुपेरी पडद्यावर नव्या स्वरुपात पाहायला मिळतंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “सुबोध भावे यांनी बालगंधर्व साकारला, भामिनीही साकारली, आता धैर्यधरही ते साकारत आहेत. हा देखील एक योगायोग आहे. आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं. मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

‘सोन्याच्या भावापेक्षा जास्त दरात नाटकाची तिकीटे विकली गेली’

“मला असं वाटतं की, खरं म्हणजे संगीत मानापमानचा 113 वर्षांचा जो इतिहास आहे, त्याबाबत लोकांमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा आहेत, लोकं देखील सांगतात की, सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा जास्त दरात त्या नाटकाची तिकीटे विकली गेली. किंवा अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यातही ज्यावेळी पैसा जमा करायचा होता त्यावेळी याच संगीत मानापमानाचे अनेक प्रयोग करण्यात आले. त्यामुळे त्याचा एक मोठा इतिहास आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“संगीत नाटकांची ही परंपरा मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे. नाट्य संगीतही तेवढंच अभिजात आहे. या सर्व परंपरा आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित 67 पदं ऐकण्याचं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल, पण मला असं वाटतं की, याचं जे सौंदर्य आहे ते या 14 पदांच्या माध्यमातून या सिनेमातून पोहोचेल त्यातून नव्या पिढीत उत्कंठा तयार होईल. आपण एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन संगीत मानापमान पाहिलं पाहिजे. ट्रेलर इतका सुंदर आहे, पिक्चर काय असेल”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी केला.