मुंबई : ‘सैराट’ (Sairat) सारख्या यशस्वी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेला ‘बाळ्या’ उर्फ ‘लंगड्या’ म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) आता मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘मन झालं बाजींद’ (Mann Zaal Bajinda) या मालिकेत तानाजी ‘मुंज्या’ची व्यक्तिरेखा साकारतोय आणि ही व्यक्तिरेखा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय.
तानाजी हा पहिल्यांदाच टेलिव्हिजन या माध्यमात काम करतोय आणि त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना तानाजी म्हणाला, ‘टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. हे माध्यम मुळातच खूप फास्ट आहे. या माध्यमातून आपण खूप कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तसंच या माध्यमात काम पण खूप वेगवान असतं ते मला अंगवळणी पडताना थोडं कठीण जातंय पण मालिकेची टीम खूपच सपोर्टिव्ह आहे त्यामुळे ते मला सांभाळून घेतात. चित्रपटात काम करताना आपल्याकडे खूप वेळ असतो. महिनाभर आधी स्क्रिप्ट मिळते मग त्यावर चर्चा होते पण टेलिव्हिजन मध्ये तसं नसतं. इथे स्क्रिप्ट हातात आली कि लगेच सिन करायचा असतो. पण इथे सगळे मला सांभाळून घेत आहेत.’
प्रेक्षकांना तानाजीची ‘मुंज्या’ ही व्यक्तिरेखा खूप आवडतेय. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, “मुंज्या या माझ्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मला मिळतोय. मुंज्याला पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. मुंज्याच्या कॅरेक्टरमध्ये असणारा निरागसपणा, त्याचा होणारा गोंधळ आणि त्याच्या रिऍक्शन्स पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतंय.”
आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.
मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.
झी मराठी वाहिनीवर ‘मन झालं बाजिंद’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे. पण मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक मात्र बुचकळ्यात पडले आहेत. त्यांना मालिकेच्या नावातील ‘बाजिंद’ या शब्दाचा अर्थ मात्र माहिती नाहीये. उभा महाराष्ट्र गुगलवर ‘बाजिंद’ या नावाचा नेमका अर्थ काय? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत बाजिंद हा शब्द मालिकेतील नायक रायासाठी वापरण्यात आला आहे. या शब्दाचा अर्थ इथे जिद्दी असा होतो. मालिकेत राया हा अतिशय जिद्दी दाखवण्यात येणार आहे.