प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुजोर कॅबचालकाचा अत्यंत वाईट अनुभव, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

| Updated on: Apr 07, 2024 | 7:54 PM

मराठी अभिनेत्री आदिती सारंगधरने पुण्यातील कॅब चालकाचा मुजोरपणा सांगितला आहे. 'वादळवाट' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री आदिती सारंगधरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. खासगी कार चालकाचा संतापजनक अनुभव आदितीने व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. एसी लावण्यावरून ड्रायव्हर आणि आदितीमध्ये काय संभाषण झालं याचा व्हिडीओ आदितीने शेअर केला आहे. आदितीने ड्रायव्हरचा चेहरा, त्याचं नाव आणि गाडीचा नंबर शेयर केला आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुजोर कॅबचालकाचा अत्यंत वाईट अनुभव, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
Follow us on

दक्षिण भारतात सिनेकलाकारांना एक आदराचं स्थान आहे. प्रेक्षक कलाकारांसाठी जीव ओवाळून टाकतात. महाराष्ट्रातही प्रेक्षक तसेच आहेत. पण काही ठिकाणी कलाकारांचा सन्मान राखला जात नाही, असं निदर्शनास येतं. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर हिला पुण्यात एक अतिशय वाईट अनुभव आला आहे. ही अभिनेत्री एका ओला कॅबने प्रवास करत होती. यावेळी कॅब चालकासोबत एसी लावण्यावरुन आदितीची बाचाबाची झाली. आदितीने कॅब चालकाचा मुजोरपणा कॅमेऱ्यात कैद केला आहे. तिने कॅब चालकाचा व्हिडीओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअरदेखील केला आहे. आदितीने घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर भूमिकादेखील मांडली आहे. पण या पोस्टवर बरेच युजर्स हे आदितीलाच सुनावताना दिसत आहेत. आदिती अशा युजर्सना उत्तर देखील देताना दिसत आहे.

आदितीने आपली भूमिका मांडली आहे. कॅब चालकाला आपण एसी वाढवायला सांगितली. पण ते कॅबचालकाने ऐकून घेतलं नाही. कॅबचालक एसी 1 वरच ठेवत होता. तो त्यापुढे एसी वाढवण्यास नकार देत होता. याशिवाय एसी 1 वरच राहणार. तुम्हाला बसायचं असेल तर बसा. नाहीतर कॅब कॅन्सल करुन खाली उतरा, अशा मुजोर शब्दांत कॅब चालक बोलल्याचा दावा आदितेने केला आहे. आपल्याला अस्वस्थ वाटत असतानाही कॅब चालकाने एसी वाढवला नाही. यावेळी आदितीने तक्रार करण्याचा इशारा दिला असता कॅब चालकाने जे करायचं ते करा, असं उत्तर दिलं.

‘अत्यंत उद्धट आणि उद्दामपणे बोलत होता’

“कॅब चालक मला सुरुवातीला एक लोकेशन सांगून दुसरीकडे उभा राहिला. याउलट मला मॅडम तुम्ही सात मिनीटे वाट बघायला लावलीत, असं म्हणाला. त्याला सांगितलं की, मला सफोकेशन होतंय. मी खिडकी उघडतेय. पाच मिनिटांसाठी एसी वाढव. तर तो आक्रमक झाला. तो अत्यंत उद्धट आणि उद्दामपणे बोलत होता. अत्यंत अस्वच्छ आणि वास येणारी गाडी, काय करावं सांगा”, असं आदितीने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे.

आदितीच्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून टीका

आदितीच्या व्हिडीओवर अनेर युजर्सनी आदितीवर टीका केली. खिडक्या उघड्या ठेवल्या तर फुल एसीसुद्धा काय करेल? मराठी ताऱ्यांच्या सामाजिक जाणीवा, अकलेबाबतचे समज घट्ट करण्याचं प्रयोजन कळलं नाही. वर पुण्याच्या नावे बोटं मोडायची? आदिती, घरचा एसी दारं-खिडक्या सताड उघडून चालवून दाखव. टॅक्सीचालकाचं बरोबर आहे. ठकास महाठक भेटल्याचा आनंद आहे, अशी टीका एका युजरने केली.

दुसऱ्या युजरनेदेखील आदितीला सुनावलं आहे. “त्यांना कंपन्या काय रेट देतात, त्यांना किती तास काम करावं लागतं, कसं सरकार त्यांची पिळवणूक करतं, रिक्षापेक्षा कमी रेटमध्ये कॅब बुक करायची. 2 वर 3 वर एसी लावा म्हणायचं. जणू ती गाडी विकत घेतली आहे या रुबाबात वागायचं. गाडीत बसल्या वरच सगळ्यांना भूक लागते. मग गाडीत काहीतरी खात बसायचं आणि त्याचा कचरा गाडीत सांडून त्याची पाकीट बाजूला दरवाज्यात ठेऊन उतरून जायचं. असे वागणारेही तुमच्या सारखीच आहेत. या सगळ्या गोष्टींवर पण 1 व्हिडिओ बनवा. मग आता जो व्हिडीओ बनवला आहे ना तो बनवून चूक केली असं वाटेल. प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू पण समजून घेत जावा”, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने सुनावलं आहे.

आदितीचं युजर्संना प्रत्युत्तर

“सुरुवातीला सगळे मुद्दे नीट लिहिले आहेत. ते वाचा मग आपली मते व्यक्त करा. खिडकी बंदच होती तरी तो कॅबचालक 1 च्या पुढे एसी करणार नाही, असं म्हणाला. अस्वच्छ गाडीतल्या दुर्गंधीमुळे मळमळायला लागून उल्टीसारखं वाटलं म्हणून दोन मिनिटे काच उघडली आणि कृपया 2 मिनिटे एसी चालू ठेवा, अशी विनंती केली. माझ्याबरोबर माझी 2 बॅकस्टेजची मुलं होती. सेलिब्रेटिंशी सोडा, माणसाने माणसाशी बोलण्याची एक पद्धत असते. तीसुद्धा त्या कॅब चालकामध्ये नव्हती. माझं काही चुकलं असेल तर सांगा”, असं आदिती कंमेंटमध्ये म्हणते.