मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata Mageshkar) यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. सगळ्यांनाच लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेता यावं असं वाटत होतं. अश्यातच पेडर रोडवरच्या त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी त्यांना अखेरचा प्रणाम करण्यासाठी अनेकजण गेले होते. यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवीदेखील (Hemangi Kavi) होती. लतादिदींचं दर्शन घ्यायला जाताना अडवणून झाल्याचं हेमांगी कवीनं सांगितलं. त्यानंतर मराठी कलाकारांना अडवलं गेल्याचा सूर उमटू लागला. यावर आता तिने फेसबुकवर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. “फक्त मराठी कलाकारांनाच नाही तर हिंदी सेलिब्रिटींनादेखील लतादिदींच्या घरी जाण्यापासून पोलिसांकडून अडवलं गेलं. हे सगळं बघून चहापेक्षा किटली गरम असं म्हणावसं वाटतं”, असं हेमांगी कवीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाली आहे.
हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट
हेमांगी कवीने घडल्या प्रकारावर फेसबुक पोस्ट लिहीत प्रकाश टाकला आहे. हेमांगी कवी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणते, “परवा मयूर अडकरच्या post वर खरंतर विचारलेल्या प्रश्नावर मी comment केली. मला आलेला अनुभव share केला. स्वतंत्र post लिहिली नाही. त्या comment मध्ये ही मी गायक जे हिंदीत प्रसिद्ध आहेत शान, मिका सिंग, शैलेंद्र सिंग, कैलास खेर, कविता पौडवाल, मराठीतले गायक बेला शेंडे, नंदेश उमप यांना जवळून दर्शन मिळावं म्हणून खूप प्रयत्न करावे लागले जे सहजरित्या मिळू शकत होतं हे नमूद केलंय. यात कुठेही पोलिसांनी bollywood, हिंदी आणि मराठी असा फरक केला नाही. आणि जर केला असेल तर तो फरक bollywood किंवा हिंदीत काम करणाऱ्यांनी केला का? तर नाही! पोलिसांना वाटलं अमुक अमुक लोकांना पाठवायला हवं, त्यांच्या मनाला वाटलं त्या लोकांनाच सहजपणे शेवटचं दर्शन घेऊ दिलं. किंवा त्यांच्यासाठी तशी सोय करण्यात आली असावी. हिंदीतल्या लोकांना आत सोडा आणि मराठील्या लोकांना नको असा काही criteria त्यांनी केला नाही. थोडक्यात मेरे मन को भाया…”, असं म्हणत तिने फक्त मराठीच नाही तर हिंदी कलाकारांनाही अडवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
चहापेक्षा किटली गरम
“हिंदीतल्या the विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर लाही इतर bollywood अभिनेत्यांसारखा थेट प्रवेश दिला नाही थांबवून ठेवलं. उशिराने आलेल्या आमिर खान, त्याची मुलगी, रणबीर कपूर, शंकर महादेवन यांना मात्र आमच्या अगदी बाजूने थेट आत सोडण्यात आलं. त्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होता. Covid मुळे तशी ही फार गर्दी नव्हती. सगळे सौजन्याने वागत होते. शांतीपूर्ण वातावरण होतं. सहज दर्शन मिळू शकलं असतं. पण नाही. तुम्ही कुणीही celebrity असला तरी आता तुम्हांला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलीस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या. तिथे काही हिंदीतल्या कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हांला पुन्हा अडवलं तेही मराठी पोलिसांनी! यात चूक त्या हिंदी कलाकारांची??? गोष्ट जेव्हा भांडणापर्यंत पोचली तेव्हा आम्हांला लताजींच्या पार्थिवाजवळ जाऊ देण्यास वाट मोकळी झाली. पार्थिवाजवळ पोचल्यावर ना कुणी अडवलं ना हटकलं. अगदी घरच्या मंडळींप्रमाणे दर्शन घेऊ दिलं. हवा तितका वेळ थांबू दिलं! मंगेशकर कुटुंबियांसोबत उभं केलं. पण gate पासून ते इथपर्यंत जो काही प्रकार झाला तो म्हणजे ‘चाय से ज्यादा किटली गरम’ हाच होता!”, असं हेमांगीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
राजकीय मंडळींना व्हीआयपी ट्रीटमेंट
“राजकारण क्षेत्रातील आणि शासकीय मंडळींमुळे, त्यांच्या सुरक्षा कारणांमुळे मनाई केली. बरं त्यात ही या लोकांसाठी वेगळी सोय केली असताना सर्व gates वर मनाई केली. ती का केली हे पोलिसच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तिथले पोलिस हिंदीतल्या गायक मंडळींना सुद्धा सतत मागे जाऊन बसायला सांगत होते आणि या हिंदी गायकांना ही शेवट पर्यंत थांबूनच ठेवण्यात आलं. मी या प्रकाराकडे वरून आलेले आदेश पोलीस पाळत होते आणि सरकारी protocols याच अर्थाने पाहिलंय. पोलिसांनी हिंदी मराठी दोन्ही गायक कलाकारांपेक्षा नेते मंडळी, शासकीय लोकांना झुकतं माप दिलं गेल्याचं दिसलं हे मात्र तेवढंच खरं! कलाकारांच्या भावनेपेक्षा नेते मंडळींची सुरक्षा महत्वाची वाटली याला bollywood कसं जबाबदार?”, अशी खंतही हेमांगीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या