मुंबई : ‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन 2021’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये डॉ.सलील कुलकर्णी यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘एकदा काय झालं…’चे विविध तीन विभागांमध्ये नामांकन झाले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि सर्वोत्कृष्ट गीत या तीन विभागांमध्ये चित्रपटाचे नामांकन झाले आहे. त्याशिवाय ‘शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल 2021’साठीसुद्धा या चित्रपटाची निवड झाली आहे.
‘गजवदना’ प्रॉडक्शन्स’ आणि ‘शोबॉक्स एंटरटेन्मेंट’ची निर्मिती असलेला‘एकदा काय झालं…’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून चित्रपटगृहे खुली होताच तो प्रदर्शित होणार आहे. ‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन 2021’साठी सुमीत राघवनचे नामांकन सर्वोत्कृष्ट अभिनेता, अर्जुन पूर्णपात्रेचे नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकार, तर ‘रे क्षणा…’ या गाण्याचे नामांकन सर्वोत्कृष्ट गीत या विभागांमध्ये झाले आहे. हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले असून, ते सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी हे गाणे लिहिले आहे.
‘एकदा काय झालं…’ बनून तयार आहे. पण हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्याचा चित्रपट आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटगृहे खुली होण्याची वाट पाहत आहोत. सध्या कोविड-19च्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने निर्माते व दिग्दर्शक म्हणून मी एकत्रित मिळून प्रदर्शनासाठी थांबायचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे नामांकन विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. चित्रपटगृहे लवकरच सुरु होतील आणि चित्रपट आपल्या सर्वांना लवकरच पाहायला मिळेल याची आम्ही वाट पाहत आहोत, असे उद्गार चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी काढले.
यातील बालकलाकारांबद्द्ल बोलताना सलील कुलकर्णी म्हणाले की, प्रमुख भूमिकेतील अर्जुन पूर्णपात्रेची निवड तब्बल 1500 मुलांच्या चाचणीतून केली गेली. “हा मुलगा जळगाव येथील चाळीसगावचा आहे आणि या नामांकनाद्वारे त्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे,” ते म्हणाले.
आघाडीचे संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसराच सिनेमा असल्याने या चित्रपटाची सर्वत्र प्रतीक्षा आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ या त्यांच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटाने प्रेक्षक व मान्यवरांची वाहवा मिळविली होती. यामुळे ‘एकदा काय झालं…’कडूनही अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. य चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले अशा नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराची यात मध्यवर्ती भूमिका आहे. ही एका गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे.
‘एकदा काय झालं…’ चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमील शृंगारपुरे व सौमेंदू कुबेर यांची शोबॉक्स एंटरटेन्मेट; अरुंधती दाते, अनुप निमकर, सलील कुलकर्णी तसेच नितीन प्रकाश वैद्य यांची ‘गजवदना’ प्रॉडक्शन्स’ यांच्यातर्फे संयुक्तपणे होत आहे.
Myra Vaikul | ‘मी हाय कोली….’, चिमुकल्या मायराच्या क्युट फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव!