Marathi Movie | अनलॉकनंतर मनोरंजनाची नांदी, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट ‘जयंती’!

| Updated on: Oct 05, 2021 | 1:32 PM

 ‘जयंती’ हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे तसेच वेगळेपणामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे कलाकार कोण या उत्सुकतेसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे.

Marathi Movie | अनलॉकनंतर मनोरंजनाची नांदी, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट ‘जयंती’!
Jayanti
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे बहुप्रतिक्षेत असलेले अनेक चित्रपट सध्या प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात बॉलिवूड सोबतच मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा घोषित करण्यात चुरस लागलेली असताना दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा येत्या 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली.

‘जयंती’ हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे तसेच वेगळेपणामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे कलाकार कोण या उत्सुकतेसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे.

दिग्गजांची टीम

बॉलिवूडमध्ये सुपरहिट झालेल्या ‘आर्टिकल 15’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ तसेच सुप्रसिद्ध मराठी चित्रपट ‘नारबाची वाडी’, ‘देऊळ’ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांना त्याच तोडीचं पार्श्वसंगीत ज्यांनी दिले असे मंगेश धाकडे यांनी ‘जयंती’ सिनेमाला संगीत तसेच पार्श्व संगीत दिले आहे. भारतीय संगीतक्षेत्रात ज्यांचं नाव मानाने घेतले जाते असे गायक जावेद अली यांनी या चित्रपटातील दोन गीतांना आपला सुमधुर आवाज दिला असून सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटाची गाणी लिहिले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘ख्वाडा’ संकलित केलेल्या रोहन पाटील यांनी ‘जयंती’च्या संकलनाची धुरा सांभाळली आहे. शाळा, किल्ला या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या रंगभूषेचे काम केलेल्या संतोष गिलबिले यांनी जयंतीच्या रंगभूषेचे काम सांभाळले आहे. चित्रपट सृष्टीत 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले नितीन वैद्य यांची “दशमी स्टुडिओज” कंपनी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

सेटवरील अपघातही चर्चेत

या चित्रपट अभिनेते मिलिंद शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सराव करत असताना, आपल्या तयारीमध्ये इतके गुंतले होते की, आजूबाजूला कोणत्या गोष्टी चालू आहेत याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉटच्या चित्रीकरणाचा सराव करत होती.

कथित सीनसाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती. या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती, नेमके तिथेचं उभे होते, हे समजलं नाही.

आणि अनर्थ टळला!

परंतु, जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली. नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें फ्रॅक्शन ऑफ सेकंदातचं खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला.

… तर संकटाची सावली आपल्यावर पडत नाही!

या प्रसंगाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे सांगतात, “एखादं चांगलं काम आपल्या हातून घडत असेल तर तेव्हा संकटाची सावलीदेखील आपल्यावर पडत नाही…! अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेच्या तयारीत रमून गेलो होतो, रात्रीच्या समयी माझ्या आजूबाजूला चालत असलेल्या गोष्टीदेखील मला त्या क्षणासाठी दिसल्या नाहीत, मग ती मोठी जिमी जीब का असेना…! मी त्यावेळी जर झुकलो नसतो तर त्या लोखंडी जिमी जीबच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती, पण सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटलंदेखील नाही. सेटवर लोकांनी वेळीचं दाखवलेल्या प्रसंगावधामुळे माझा जीव वाचला….! मी जरी माझ्या कामात रमलो असलो तरी सेट वरील प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केलं याचं मला कौतुक वाटतं.”

“लोकांचा हक्काचा सण” म्हणत खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट “जयंती” हा येत्या 26 नोव्हेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजनरुपी प्रबोधन करेल यात मात्र शंका नाही.

हेही वाचा :

Aryan Khan drug case : आता ड्रग्ज पार्टीप्रकरणात मुंबई पोलिसांची एण्ट्री, तर NCB ने ही तीन राज्यातील अधिकाऱ्यांची फौज मागवली

राजकुमार संतोषी कधीपासून तयार, मांजरेकरांचे वरातीमागून घोडे! प्रा. हरी नरके यांची ‘गोडसे’वर टीका