मुंबई : बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा ‘मीडियम स्पाइसी’ (Medium Spicy) नॉर्वे बॉलिवूड महोत्सवात (Norway Bollywood Film Festival) प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. जवळजवळ गेले 19 वर्ष हा बॉलिवूड महोत्सव साजरा केला जातोय. यंदा ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर नॉर्वे मध्ये होणार आहे. भारतात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी, या सिनेमाचे मुख्यतः पुण्यात आणि मुंबईतील काही ठिकाणी चित्रीकरण झाले.
प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा चित्रपट
मोहित टाकळकर दिग्दर्शित, मीडियम स्पाइसी हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, तसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल यांनी व्यक्त केल्या भावना
लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणतात, “आम्ही प्रेक्षकांसाठी सिनेमा प्रदर्शित करण्याची वाट पाहत होतो. तर, आता नॉर्वेमध्ये ‘मीडियम स्पाइसी’चे पहिले स्क्रीनिंग करण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. खरंतर, कलेला सीमा नसतात; तसंच चित्रपट महोत्सव आपल्याला चित्रपटांद्वारे आपल्या कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्याची संधी देतात.”
नॉर्वेमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल मोहित टाकळकर म्हणतात, “एक दिग्दर्शक म्हणून, आमचा सिनेमा साता समुद्रापार चालला आहे हे बघून अत्यंत समाधान वाटतं. खरंतर जेव्हा आम्ही हा सिनेमा बनवला, तेव्हा या सिनेमाने त्याच्या प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त ठिकाणी प्रवास करावा अशी आमची इच्छा होती. माझ्या सिनेमाच्या टिमला आणि निर्मात्यांना आशा आहे की ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा महोत्सवात चांगलाच स्वाद आणेल ! ”
नॉर्वे बॉलिवूड फेस्टिव्हल हा अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक
नॉर्वे बॉलिवूड फेस्टिव्हल हा अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील कलाकारांना त्यांच्या अद्भुत योगदानाबद्दल सन्मानित करतात. याआधीच्या महोत्सवात सलमान खान, विद्या बालन, हेमा मालिनी, अनिल कपूर, डेव्हिड धवन, मधुर भांडारकर आणि बोमन इराणीसारख्या काही कलाकारांनी हजेरी लावली होती.
संंबंधित बातम्या