‘हर हर महादेव’ चित्रपट झी वाहिनीवर दाखवू नये, स्वराज्य संघटनेची मागणी

| Updated on: Dec 15, 2022 | 4:34 PM

येणाऱ्या पिढीपुढे शिवरायांचा इतिहास चुकीचा जाऊ नये, या अनुषंगाने ह्या चित्रपटाला विरोध केला आहे.

हर हर महादेव चित्रपट झी वाहिनीवर दाखवू नये, स्वराज्य संघटनेची मागणी
Follow us on

नाशिक : हर हर महादेव या चित्रपटाला आता मोठ्या संख्येने विरोध हा केला जातोय. हर हर महादेव या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने दाखवला असून, हा चित्रपट कुठेही टिव्ही वाहिनीवर दाखवू नये, अशी मागणी स्वराज्य संघटनेकडून करण्यात आलीये. गेल्या काही दिवसांपासून हर हर महादेव हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण राज्यातून विरोध वाढतांना दिसतोय.

येणाऱ्या पिढीपुढे शिवरायांचा इतिहास चुकीचा जाऊ नये, या अनुषंगाने ह्या चित्रपटाला विरोध केला आहे. असं असूनही झी मराठीने हा चित्रपट दाखवण्याचा हट्ट केला असून याच्यामागचं कारण आम्हाला अद्याप समजू शकलं नाही, असं वक्तव्य स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी केलंय.

झी मराठी वाहिनीने असा दावा केला आहे, की ह्या चित्रपटातला चुकीचा भाग आम्ही वगळला आहे आणि जो मूळ चित्रपट आहे तो दाखवू. याचा अर्थ असा होतो की, हा चित्रपट चुकीचाच बनवला गेला आहे, असेही करण गायकर यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांत जर भूमिका स्पष्ट केली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा करण गायकर यांनी दिलाय. तसेच समस्त शिवप्रेमींना झी मराठी या वाहिनीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण गायकर यांनी केले.

हर हर महादेव चित्रपटातील दृश्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद प्रचंड वाढला आहे. चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडला असल्याचा आरोप आहे.