अभिनेते, दिग्दर्शक आणि बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi) सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आगामी ‘दे धक्का 2’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण थक्क झाले. 2021 मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. महेश मांजरेकर यांनी कर्करोगावर मात दिली असून त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole) हिने नुकतेच सोशल मीडियावर महेश मांजरेकर यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनची वाट पाहत असल्याचंही काहींनी म्हटलंय. ‘सर सॉलिड दिसत आहात. अब आयेगा बिग बॉस मराठी 4 मे मजा, सर तुम्ही खरंच आम्हाला प्रेरणा दिलीत’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘वाघ परतलाय’ अशा शब्दांत दुसऱ्या नेटकऱ्याने कौतुक केलं. एका युजरने त्यांच्यासाठी शायरीसुद्धा लिहिली. ‘ठोकर खा कर गिरना फिर खुद को खुद ही संभालना फिर दोबारा से चलना यही संघर्ष है यही जीवन का सत्य है,’ असं त्याने लिहिलं.
गेल्या वर्षी बिग बॉस मराठी 3 लाँच होण्यापूर्वी महेश मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला होता. यानंतर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरीनंतर लगेचच त्यांनी प्रोमोचं शूटिंग केलं होतं. त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान त्यांनी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन केलं. याविषयी सांगताना महेश मांजरेकर म्हणाले होते की, “मी नुकताच आजारातून बरा होत होतो आणि त्याच वेळी ‘बिग बॉस मराठी 3’ची घोषणा झाली. शस्त्रक्रिया झाली असली तरी, त्यावेळी मला कॅथेटर लावला होता. त्याच्या ट्यूब शरीरावर होत्या. अशा परिस्थितही ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत मी बिग बॉस मराठी सीझन 3च्या प्रोमो शूटसाठी तयार झालो होतो. शूटिंग वेळी या ट्यूब लपवण्यात आल्या होत्या. शूट दरम्यान वेदनादेखील जाणवत होत्या. शरीरात ऊर्जा कमी होती, पण मनात कामाचा जोश होता आणि अशा प्रकारे हे शूट आम्ही पूर्ण केलंच.”