मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हर हर महादेव या चित्रपटावरून मोठा वाद उभा राहिलाय. चित्रपटामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप हा सातत्याने केला जातोय. इतकेच नाही तर या वादामध्ये राजकीय पक्षांनी देखील उडी घेतल्याने वाद चिघळताना दिसतोय. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना कायदेशीर नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरूच आहे. आता हर हर महादेव चित्रपटाच्या लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकाला वकिलांमार्फत नोटीस पाठवण्यात आलीये.
हर हर महादेव चित्रपटावरील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी दिलेली नोटीस आता चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांना मिळाली असल्याची माहिती कळते आहे. नोटीसीद्वारे घेण्यात आलेल्या आक्षेपांवर उत्तर देण्याची मागणी केली आहे. उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. इतकेच नाही तर 7 दिवसांत उत्तर दिले नाही तर कायदेशीर गुन्हा पोलिसांत दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
वकिल विकास शिंदे यांच्या मार्फत ही नोटीस देण्यात आलीये. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांना नोटीस मिळाल्याची माहिती वकिलांनी दिलीये. हर हर महादेव चित्रपटाच्या निर्माता ,दिग्दर्शकांना आता सात दिवसांची मुदत उत्तर देण्यासाठी मिळाली आहे. ही नोटीस पोस्टाद्वारे आज निर्माता ,दिग्दर्शकांना मिळाली आहे. एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाविरोधात मोठे आंदोलन देखील केले होते.