Pawankhind Box Office Collection: शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला (Marathi Movie) बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला. या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पहिल्या वीकेंडला दणक्यात कमाई केली. आता पहिल्या आठवड्याच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाने 10 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए.ए.फिल्म्स प्रस्तुत पावनखिंड’ या चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
sacnilk.comने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पावनखिंड’ची पहिल्या आठवड्याची कमाई ही जवळपास 10.97 कोटी रुपये इतकी झाली आहे. या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. त्यातच ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या यशस्वी चित्रपटांमुळे ‘पावनखिंड’ चित्रपटाकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली होती.
पहिल्या आठवड्याची कमाई-
शुक्रवार- 1.15 कोटी रुपये
शनिवार- 2.08 कोटी रुपये
रविवार- 2.80 कोटी रुपये
सोमवार- 1.22 कोटी रुपये
मंगळवार- 1.20 कोटी रुपये
बुधवार- 1.28 कोटी रुपये
गुरुवार- 1.24 कोटी रुपये
पहिल्या आठवड्याची कमाई- जवळपास 10.97 कोटी रुपये
या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी या कलाकारांसोबतच संतोष जुवेकरनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’ची यशस्वी घोडदौड; वीकेंडला कमावले तब्बल इतके कोटी रुपये
संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ