‘खिळा रुतलेला आहे, आता फक्त ठोकायचा बाकी आहे’, असं उत्तर अभिनेता अंकित मोहनने (Ankit Mohan) त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी बोलताना दिलं. ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटात अंकितने रायाजी बांदल यांची भूमिका साकारली. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या इतरही काही चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. अंकितने एका रिॲलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने बेगुसराय, नागिन 3 यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. मात्र 2018 मधील ‘फर्जंद’ या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. हा 16 वर्षांचा प्रवास आणि संघर्ष यांविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला.
“एकेकाळी गुरुद्वारामधील लंगर खाऊन मी पोट भरलं, कधी कधी उपाशी पोटीच काम केलं, ऑडिशन्ससाठी अनेकदा पायीच गेलो, तर कधी बसने प्रवास केला. तू रिॲलिटी शो केलंस, तर बसने प्रवास का करतो असा प्रश्न लोक विचारायचे. त्यावेळी माझा प्रत्येक दिवस अवघड, कष्टाचा होता. पेईंग गेस्टमध्ये राहायचो तिथले रुममेट्स मला वाईट वागणूक द्यायचे. कधी कधी तर फक्त दिवसा 10 ते 20 रुपयांवर मी जगलोय. अकाऊंटमध्ये मोजकेच पैसे होते, हाती काम नव्हतं, ऑडिशन्समध्ये यश मिळत नव्हतं. फक्त नकारच मिळत होता. स्वत:वर खर्च करण्यासाठी कोणतीच कमाई नव्हती”, असं अंकितने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
“मला माहितीये की वेळ लागला, पण हळूहळू गोष्टी रुळावर येऊ लागल्या. कठीण काळामुळे मी चुकीच्या मार्गावर गेलो नाही. माझ्या मुलानेही कष्ट करून यश मिळवावं अशी माझी इच्छा आहे”, असं तो पुढे म्हणाला. यावेळी अंकित त्याच्या स्वभावाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाला.
“जेव्हा मला प्रसिद्धी मिळाली, तेव्हा ते पचवता आलं नाही. एकदा एका शेव्हिंग प्रॉडक्टच्या ऑडिशनसाठी गेलो असता, मी एका व्यक्तीशी अत्यंत रागाने वागलो. मी त्याला म्हटलं की मी एका रिॲलिटी शोमध्ये काम केलंय. तेव्हा तो मला म्हणाला, “ते तर जुनं झालं, आता काय केलंस?” हे ऐकून मी नि:शब्द झालो. मी ते ऑडिशन दिलं नाही. भूतकाळात मिळवलेल्या यशावर आपण फार काळ अवलंबून राहू शकत नाही हे मला तेव्हा समजलं. तुम्हाला सतत काम करावं लागेल”, असा अनुभव त्याने सांगितला.