हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता ‘वंदे मातरम्‘ (Vande Mataram) म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मुनगंटीवार यांच्या या घोषणेला अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) पाठिंबा दिला आहे. प्राजक्ताची स्वातंत्र्यदिनाची पोस्ट यानिमित्त चर्चेत आली आहे.
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव.. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता , परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो. या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं! या कामी सर्व देशवासीयांनी झटावं! आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद, #वंदेमातरम् सुरू. “देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती” ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना,’ अशी पोस्ट तिने लिहिली असून त्यासोबत अटल बिहारी वाजपेयी यांची एक कवितासुद्धा तिने पोस्ट केली आहे.
दुसरीकडे मुनगंटीवार यांच्यावर टीका होत आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशार देत कुणी काय खावं, काय घालावं आणि आता काय बोलावं हे तुम्ही ठरवणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवार यांना विचारला आहे. जर आम्ही तसं म्हटलं नाही तर तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.