राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला असं म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी राजभवनात पार पडला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार सत्तेत येईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, दिवसभरात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या विविध नाट्यमय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) एकनाथ शिंदेंना आपल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या प्रमोशनचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
यातील एका फोटोमध्ये आनंद दिघेंच्या वेशात उभ्या असलेल्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर हात टाकला आहे. धर्मवीर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा हा फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे हात जोडून उभे असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या मागे उभा राहून आनंद दिघेंच्या वेशात प्रसाद ओक त्यांना पाहत आहे. ‘मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ या चित्रपटात प्रसादने आनंद दिघेंची भूमिका साकारली. तर अभिनेता क्षितिज दाते हा एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत होता.
अभिनेते शरद पोंक्षेंनी ‘माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथची शिंदे साहेबांचं अभिनंदन’, अशी पोस्ट लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या. तर आरोह वेलणकरने, ‘सरप्राईज सरप्राईज.. वॉव, आपण याला राजकीय मास्टरस्ट्रोक म्हणू शकतो का? तुम्ही काय म्हणाल?’, असं लिहित ट्विटरवर पोल घेतला. ‘याहून भारी ट्विस्ट फक्त Shwashak Redemption’ मध्ये होता,’ अशी पोस्ट लेखक क्षितिज पटवर्धनने लिहिली आहे. The Shwashak Redemption हा एक चित्रपट आहे.