प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधीतरी प्रेमात पडतोच. त्या प्रेमाला हळुवारपणा, आनंद, विरह, दु:ख, त्याग असे अनेक रंग असतात. प्रेमभावनेचे असेच अनोखे रंग दाखवणारा डार्लिंग (Darling) हा मनोरंजक मराठी चित्रपट येत्या रविवारी झी टॉकीजवर (Zee Talkies) पहायला मिळणार आहे. रविवारी 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता डार्लिंग चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर रंगणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनेत्री रितीका श्रोत्री यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांना ‘लागीरं झालं जी’ आणि ‘कारभारी लयभारी’ फेम निखिल चव्हाणची सुरेख साथ लाभली आहे.
डार्लिंग चित्रपटाची कथा आहे… बबली, राजाभाऊ आणि तुषारच्या अल्लड आणि अवखळ प्रेमाची. बबली ही तुषारच्या (प्रथमेश परब) प्रेमात पडते. त्या दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम असतं. राजाभाऊ (निखिल चव्हाण) देखील बबलीवर प्रेम करत असतो. मात्र त्याचं हे प्रेम एकतर्फी असतं. तोदेखील बबलीला मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या करत असतो. त्यातून उडणारी धमाल म्हणजे ‘डार्लिंग’ हा चित्रपट. रूढ अर्थाने आपण ज्याला प्रेमाचा ‘त्रिकोण’ म्हणतो तशा प्रकारची ही कथा असली तरी त्याही पलीकडे ही नात्यांची गोष्ट आहे. वेगवेगळ्या नात्यांची ही गोष्ट दाखवताना प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनाची स्पंदन अचूक टिपणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, निखिल चव्हाण यांच्यासोबतच मंगेश कदम आणि आनंद इंगळे यांनीसुद्धा या चित्रपटात धमाल केली आहे.
चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ‘डार्लिंग’चं लेखनही समीर आशा पाटील यांनी केलं आहे. संगीतकार चिनार-महेश या संगीतकार जोडीनं या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे.