मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते वैभव मांगले कला क्षेत्राच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आहे. मराठी चित्रपटातील ‘शाकाल’ असो वा ‘माझे पति सौभाग्यवती’ मालिकेतील स्त्री व्यक्तिरेखा असो, प्रत्येक वेळी वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारून अभिनयासोबतच त्यांच्या सुरेल आवाजाने, इतकेच नव्हे तर सुरेख चित्रकलेने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
यंदा ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्यातील चेटकिणीची भूमिका साकारत वैभव मांगले यांनी अवघ्या तीन वर्षाच्या लहान मुलापासून सर्वांना चेटकिणींच्या प्रेमात पाडतात. त्यांच्या अभिनयामुळे अक्षरशः शंभरीच्या वयोवृद्ध अण्णांना देखील पुन्हा लहान होऊन जगण्याचे सुख दिले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
गेली 15 ते 16 वर्ष या व्यावसायिक नाट्य क्षेत्रात एक यशस्वी आणि प्रस्थापित निर्माता म्हणून काम करत असलेले निर्माते राहुल भंडारे. मुळात ज्या क्षेत्रच कसलाही अनुभव नसताना, त्या क्षेत्राशी संबंधित कसलेही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना आणि कसलेच आर्थिक पाठबळ नसताना नाटक क्षेत्रामध्ये एक निर्माता म्हणून एक उद्योजक म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि या क्षेत्रात स्वतःचे पाय रोवले. या रंगभूमीला वेगवेगळ्या आशयाची, विषयाची आणि वेगवेगळ्या लेखकाची नाटक या रंगभूमीला दिली आणि ती यशस्वी रित्या गाजवली देखील.
राहुल भंडारे यांच्या बऱ्याच नाटकांनी या प्रस्थापित रंगभूमीवरील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नामांकने आणि अवॉर्ड सोहळयांमध्ये अवॉर्ड पटकावले आहेत. समीक्षक आणि प्रेक्षकांच्या कौतुकासोबातच नाटकाला बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. “जागो मोहन प्यारे” या व्यावसायिक मनोरंजक नाटकाद्वारे यांनी नाट्य क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण केले आणि तिथे स्वतःची ओळख निर्माण केली.
नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नसून लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे माध्यम होऊ शकते यावर ठाम विश्वास दाखवत, “शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहोल्ला”, “ठष्ट”, “बॉम्बे 17”, “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी” यासारखी सामाजिक भान निर्माण करणारी व्यावसायिक नाटक त्यांनी रंगभूमीवर घेऊन येण्याचे धाडस करत एक प्रयोगशील निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
सामाजिक सोबतच, प्रायोगिक, व्यावसायिक आणि ‘अलबत्या गलबत्या’ व ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या बालनाट्याद्वारे नवा प्रेक्षक रंगभूमीकडे वळवत मराठी रंगभूमीवर मोलाचे योगदान दिले आहे.
या दोन्ही कलावंतांच्या कामगिरीला निदर्शनात आणत भारतीय डाक मार्फत या दोघांना कौतुकाची थाप म्हणून भारतीय पोस्टाच्या तिकिटावर (MY STAMP) वर त्यांचे फोटो छापून सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेते वैभव मांगले आणि नाट्यनिर्माता राहुल भंडारे यांच्या सन्मानार्थ असलेल्या या पोस्टल तिकिटचे (MY STAMP) लाँच आज, 11 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले आहे.