जळगाव : प्रसिद्ध अहिराणी गाणं ‘साली नंबर 1’ या गाण्याचे गायक नवल माळी यांचं शनिवारी (7 जानेवारी) सकाळी निधन झालं. नवल माळी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अहिराणी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे अहिराणी गाणी आणि चित्रपट तयार करणाऱ्या इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालंय. हे नुकसान कधीही भरुन काढता येणार नाही, असंच आहे.
नवल माळी यांचं ‘साली नंबर 1’ हे अहिराणी गीत प्रचंड गाजलंय. तसंच ते गाणं आजही डीजेवर लागलं तर अनेक तरुण मुलं थिरकतांना दिसतात. मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये या गीतावर देखील हौशी रसिक नाचत असत.
गुजरातच्या अहमदाबाद, सूरत आणि बडोदा शहरात या गीताच्या कॅसेट विक्रीने उच्चांक गाठला होता. नवल माळी यांचे अहिराणीमध्ये फार मोठं योगदान आहे. त्यांनी शेकडो अहिराणी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती .
अहिराणी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले ज्येष्ठ संगीतकार विश्राम (आप्पासाहेब) बिरारी यांनी नवल माळी यांच्या निधनाच्या वृत्तावर दु:ख व्यक्त केलंय.
“आज अहिराणीत योगदान असलेला अहिराणीचा खरा कलावंत गेल्याचे दुःख अनेक अहिराणी कलावंतांमध्ये आहे. नवल माळी यांची परिस्थिती खूप नाजूक होती. प्रचंड अहिराणीतलं काम असूनही आमच्या अहिराणी कलावंतांची झोळी खाली असते याचे जीवंत उदाहरण म्हणजे नवल माळी”, अशा शब्दांत विश्राम बिरारी यांनी शोक व्यक्त केला.
“अशोक चौधरी सरांच्या अनेक अहिराणी चित्रपटात नवल हमखास असायचा . नवल माळी यास भावपूर्ण श्रद्धांजली”, असं विश्राम बिरारी म्हणाले.