उन्मळून पडणाऱ्या झाडाचं (Tree) पुनर्रोपण करणं शक्य असतानाही अशा झाडावर कुऱ्हाड चालवल्याने अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर त्याने यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण आपल्या घराजवळील झाड वाचवू शकलो नाही, याची खंत त्याने या व्हिडीओमध्ये व्यक्त केली. ठाणे (Thane) महापालिका हद्दीत वर्षभर विविध कारणांमुळे झाडं पडण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासून गेल्या महिनाभरात जवळपास 100 हून अधिक झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. परंतु त्याची दखल पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून घेतली जात नाही, याकडे संतोषने लक्ष वेधलं.
संतोषच्या ठाण्यातील घराबाहेरील विलायची चिंचेचे झाड उन्मळून पडलं होतं. हे झाड बहरलेलं असल्यामुळे त्याचं पुनर्रोपण करणं शक्य होतं. त्यासाठी संतोषने प्रयत्नही केला होता. मात्र काही वेळासाठी तो घराबाहेर गेला असता, पालिकेनं ते झाड कापून टाकलं. संतोष घरी परत आल्यानंतर हा प्रकार पाहून तो अस्वस्थ झाला आणि याबाबत त्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. तसंच झाड वाचवू शकलो नाही, याची खंत व्यक्त केली.
‘माझ्या बिल्डिंगबाहेरील एक झाड उन्मळून पडलं होतं. ते छान बहरलेलं आणि जिवंत होतं. या झाडाचं पुनर्रोपण केलं तर ते जगेल, यासाठी मी प्रयत्न केले. विजू माने यांना फोन केल्यानंतर त्यांनी वृक्ष संवर्धनाचं काम करणारे रोहित जोशी यांचा नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं. ते त्यांच्या टीमला घेऊन आले. मीसुद्धा बराच वेळ इथे उभा होतो. काही कामासाठी 10 ते 15 मिनिटं केवळ बाहेर गेलो, त्यावेळी हे झाडं कुणीतरी कापून टाकलं. ही फार वाईट, विचित्र आणि घाणेरडी बाब आहे. मी झाड वाचविण्याचा प्रयत्न केला. पण वाचवू शकलो नाही, याची खंत आहे’, असं तो म्हणाला.
आपल्या घरात कुणी आजारी पडलं किंवा अपघातात लुळंपांगळं झालं तर आपण त्याला घराबाहेर काढतो का? त्याची काळजी घेऊन बरं करतो ना? तशीच निसर्गाची काळजी घ्या, तरंच निसर्ग आपली काळजी करेल. आपल्या घराजवळ कुठेही झाड उन्मळून पडलं असेल आणि त्याचं पुनर्रोपण शक्य असेल तर ते जरुर करा, असंही आवाहन त्याने चाहत्यांना केलं.
विलायती चिंचेचं झाड हे पक्षांच्या खाद्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. शहरात पक्षांना नैसर्गिकरित्या खायला काही मिळत नाही. विलायती चिंचेच्या झाडावर खूप चिंचा येतात. ते पक्षांच्या उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व जातीचे पक्षी दिसून येतात. हे झाड मोठं होण्यासाठी जवळपास वीस ते तीस वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे अशी झाडं वाचविणं गरजेचं आहे, असं पर्यावरणप्रेमी रोहित जोशी म्हणाले.