मराठी मुलूखात मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Mahraja) आधारित ‘पावनखिंड’ (Pavankhind) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक गर्दी करत आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये ‘पावनखिंड’च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मराठमोळा पोशाख, नऊवारी साडी, फेटे, ढोल-ताशे आणि तुताऱ्यांच्या निनादात ‘पावनखिंड’चे शो पाहिले जात आहेत. अशातच अंगावर रोमांच उभे करणारा सिनेमागृहातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनेमागृहात ‘पावनखिंड’ चित्रपट संपताना शिवगर्जना म्हणणाऱ्या तरुणाचा हा व्हिडीओ आहे. ३० सेकंदांचा या व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याची भावना अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. (Marathi Movie)
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. ही यशोगाथा पाहिल्यानंतर श्रेयनामावली दाखवली जात असताना या तरुणाने आपल्या भारदस्त आवाजात शिवगर्जना म्हटली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत थिएटरमध्ये अशा पद्धतीने शिवगर्जना म्हणण्याचं स्वप्न असल्याची भावना व्यक्त केली आहे.
One day Dream for chanting tis slogans in theater ?
Har Har Mahadev ?#Pavankhind pic.twitter.com/lzHwuvVwq6— prince Gangadhar? (@jai_jai_shivay) February 23, 2022
या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पहिल्या वीकेंडला दणक्यात कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असल्याचं कळतंय. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी 1.15 कोटी रुपये, शनिवारी 2.05 कोटी रुपये आणि रविवारी तीन कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. त्यामुळे वीकेंडला जवळपास सहा कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. प्रेक्षकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मल्टिप्लेक्समधीलही शो वाढवण्यात आले आहेत. रविवारी महाराष्ट्रात तब्बल 1900 शोज लावण्यात आले.