शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. गेल्या सोमवारी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी झाल्याने राज्य सरकारच्या स्थिरतेवरील प्रश्नचिन्ह आठवड्यानंतरही कायम राहिलंय. शिवसेनेने रविवारी ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन केलं. शिवसेनेतील आमदारांची गळतीही कायम आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे रविवारी गुवाहाटीमध्ये शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिंदे यांना साथ देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या 39 झाली आहे. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल परब हे तीनच मंत्री आता शिवसेनेत आहेत. उर्वरित सर्व मंत्र्यांनी गुवाहाटी गाठलं आहे. या सत्तासंघर्षाबाबत अभिनेता आरोह वेलणकरने (Aroh Welankar) नवीन ट्विट केलं आहे. राज्याला हा वेडेपणा नको तर स्थिर सरकार हवं आहे, असं त्याने म्हटलंय.
‘उदय सामंत पण गुवाहाटीत, निवडून आलेला एकही मंत्री आता साहेब आणि प्रिंससोबत नाही. आता उरले फक्त ते सिलेक्टेड नेते. मला वाटतं की न्यायालयाने हस्तक्षेप करून हे सर्व थांबवण्याची वेळ आली आहे. राज्याला हा वेडेपणा नको तर स्थिर सरकार हवं आहे,’ असं ट्विट आरोहने केलं आहे.
उदय सामंत पण गुवाहाटीत, निवडून आलेला एकही मंत्री आता साहेब आणि प्रिंस सोबत नाही. आता उरले फक्त ते “सिलेक्टेड” नेते. I think its high time the courts intervene and stop all that is happening. State needs a stable government not this madness. #MaharashtraPolitcalCrisis
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 26, 2022
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत आरोह ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. याआधीही त्याने सत्तासंघर्षाबाबत काही ट्विट्स केले होते. या ट्विटमधून त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. ‘महाराष्ट्रात जे काही घडत आहे ते घराणेशाही राजकारण आणि घराणेशाही राजकीय पक्षांसाठी मोठ्या बदलाचा क्षण असू शकतो. या साऱ्या गोंधळात सर्वसामान्य मतदारांचा नाहक बळी जात असल्याचं पाहून वाईट वाटतं,’ असंही त्याने एका ट्विटमध्ये म्हटलं होतं.
शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना नोटीस बजावण्यात आली असून आज (सोमवार) संध्याकाळपर्यंत त्याला उत्तर द्यायचं आहे. मात्र शिंदे यांच्या गटाने या नोटिसींनाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसंच नवे गटनेते नियुक्त करण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे.