मुंबई : आज अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे मराठी चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून सुबोधचे अभिनयकौशल्य पाहिल्यानंतर त्याच्या अभिनयाचा सर्वांनाच अंदाज आला. आता सुभोध भावे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर, वाढदिवसाचे निमित्त साधत त्यांनी आपल्या चाहत्यांना एक खास भेट देखील दिली आहे.
सुबोध भावे यांच्या ‘फुलराणी’ (Phulrani) या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज अभिनेता सुबोध भावे यांचा वाढदिवस आहे. याचेच खास निमित्त साधत हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘फुलराणी’ ह्या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या! कोरोनाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे खूप समाधान आहे. 2022 मध्ये आधी चित्रपटगृहांत आणि मग बाकी माध्यमांतून ‘फुलराणी’ प्रदर्शित करायचा मानस निर्मात्यांनी आणि फुलराणीच्या सर्व टीमने केला आहे. फुलराणीचे पहिले motion poster खास तुमच्यासाठी!, असे म्हणत सुबोध भावे यांनी ही खास पोस्ट शेअर केली आहे.
जवळपास गेले दोन वर्ष संपूर्ण जग आणि विश्व देखील कोरोनामुळे ठप्प झालं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सगळ्यावरच अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले होते. अखेर काहीसा कहर कमी होताच आर्थिक चक्र सुरळीत होऊन जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी काही निर्बंध हटवत आवश्यक कामांना परवानगी देण्यात आली. याच दरम्यान चित्रपटसृष्टीतील अडकलेली चक्र पुन्हा सुरु झाली आणि चित्रीकरणाने देखील वेग पकडला. याच जोखमीच्या काळात संपूर्ण काळजी घेत सुबोध भावे यांच्या ‘फुलराणी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले होते.
सुबोध भावे अभिनीत विश्वास जोशी दिग्दर्शित चित्रपट ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या कलाकृतीने प्रेरित आहे. या चित्रपटाला प्रियंका बर्वे, आनंदी जोशी, शरयू दाते, निलेश मोहरीर, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, हृषीकेश रानडे अशी गायक आणि संगीतकरांची तगडी फौज लाभली आहे. तर, गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटातील गीतांचे बोल लिहिले आहेत.