मुंबई : ‘श्यामची आई’ म्हटलं की सर्वप्रथम आठवतात ते पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच सर्वांचे लाडके साने गुरुजी… 1933मध्ये लेखणीतून कागदावर अवतरलेल्या ‘श्यामची आई’ बाबतचं (Shyamchi Aai) कुतूहल आज इतक्या वर्षांनी तसूभरही कमी झालेलं नाही. याच कुतूहलापोटी आणि नव्या पिढीला श्यामची आई समजावी या भावनेतून दिग्दर्शक सुजय डहाकेनं (Sujay Dahake) ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ करण्यात आला आहे. कोकणातील पावस (Pawas) या पवित्र ठिकाणी ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. आजकालच्या रंगीबेरंगी युगातील हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट (Black and White) असल्यानं रसिकांना जुन्या काळात घेऊन जाणार आहे.निर्मात्या अमृता अरुण राव यांच्या अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली ‘श्यामची आई’ची निर्मिती केली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाहून ‘श्यामची आई’चा मुहूर्त आणि शूटिंगची सुरुवात करण्यात आली.
दोन शूटिंग शेड्युलमध्ये चित्रपट पूर्ण करण्याची योजना असणाऱ्या ‘श्यामची आई’चं पहिलं शूटिंग शेड्युल सुरू झालं आहे. आईबद्दलचं अपार प्रेम, भक्ती व कृतज्ञतेच्या भावनेतून साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिलं. नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी अवघ्या पाच दिवसांमध्ये ‘श्यामची आई’चं लेखन केलं होतं. त्यांनी कागदावर उतरवलेली त्यांच्या मनातील आई आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. श्याम आणि त्याची आई आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं सुजयनं ‘श्यामची आई’चं शिवधनुष्य उचललं आहे. यातील आजवर दुर्लक्षित राहिलेले काही पैलू सादर करण्याचा सुजयचा प्रयत्न आहे. या चित्रपटात श्यामच्या टायटल रोलसाठी महाराष्ट्रभरातील बाल कलाकारांची आॅडीशन घेऊन निवड करण्यात आली असली तरी त्यांची नावं सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. कोकणामधील बऱ्याच नयनरम्य ठिकाणांवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात येणार आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सुजयनं नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शाळा’द्वारे पुरस्कारांना गवसणी घालणाऱ्या सुजयनं ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे विविधांगी आणि नावीन्याचा ध्यास असलेले सिनेमे बनवत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. ‘श्यामची आई’ हा चित्रपट या वाटेवरील पुढचं पाऊल असून, यासाठी त्यानं खूप रिसर्च केला आहे. आपला सिनेमा सर्वांगानं रसिकांना त्या काळात म्हणजेच श्याम आणि त्याच्या आईच्या काळात घेऊन जाणारा ठरावा यासाठी सुजय आणि त्याची टिम खूप मेहनत घेत आहे. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचं असल्यानं हा चित्रपट जणू दादासाहेबांना मानवंदना देणारा ठरावा अशी संपूर्ण टिमची भावना आहे.
संबंधित बातम्या